त्वचा ताणली जाऊन त्यानंतर एकदम सैल पडली की त्वचेवर स्ट्रेच मार्क्स उत्पन्न होतात. एकदा जर हे स्ट्रेच मार्क्स उत्पन्न झाले तर मग हे हटविणे कठीण काम असते. बाजारामध्ये मिळणाऱ्या निरनिराळ्या क्रीम्स पासून ते घरगुती उपायांपर्यंत सर्व काही करून पहिले तरी स्ट्रेच मार्क्स कमी होत नाहीत. अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने आपले वजन कमी केल्यानंतर तिच्या शरीरावर उत्पन्न झालेले स्ट्रेच मार्क्स दर्शविणारे छायाचित्र सोशल मिडियावर नुकतेच प्रदर्शित केले होते. या स्ट्रेच मार्क्स बद्दल अधिक जाणून घेऊ या.
स्ट्रेच मार्क्सशी निगडीत काही तथ्ये
महिलांमध्ये स्ट्रेच मार्क्स हे गर्भावस्थेच्या काळामध्ये जास्त आढळतात. तसेच शरीराचे वजन कमी झाल्याने शरीराचे आकारमान बदलते. त्यावेळी ही ताणलेली त्वचा एकदम सैल पडल्याने स्ट्रेच मार्क्स उद्भवू शकतात. त्वचेमध्ये कोलाजेन ची निर्मिती कमी झालीकी त्वचा एकदम ढिली पडते. त्यामुळे त्वचेवर स्ट्रेच मार्क्स उद्भवतात.
प्रत्येक स्कीन टोनवर पडणारे स्ट्रेच मार्क्स वेगवेगळे असतात. उजळ रंगाच्या त्वचेवर लालसर, किंवा गुलाबी रागाचे स्ट्रेच मार्क्स उत्पन्न होतात. त्वचेवर जर उन्हामुळे काळसर पणा आला असेल, तर त्वचेच्या रंगापेक्षा हलक्या रंगाचे स्ट्रेच मार्क्स उत्पन्न होतात. त्वचा कोरडी पडत असल्याने सतत ताणली जाते. त्यामुळे देखील त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात. स्ट्रेच मार्क्स चेहरा सोडून बाकी शरीरावर कुठे ही उत्पन्न होऊ शकतात. स्ट्रेच मार्क्स सर्वसाधारणपणे हात, पाय, पोट, पाठ, कंबर, मांड्या इत्यादी ठिकाणी उत्पन्न होतात.
स्ट्रेच मार्क्स जर नुकतेच उद्भविले असतील, तर त्यांना हटविणे शक्य होऊ शकते. नव्याने उत्पन्न झालेल्या स्ट्रेच मार्क्सचा रंग हलका गुलाबी असतो. जसजसे स्ट्रेच मार्क्स जुने होत जातात, त्यांचा रंग पांढरा होत जातो. जर तुमच्या त्वचेवर हलके गुलाबी स्ट्रेच मार्क्स आले असतील, तर हे स्ट्रेच मार्क्स काही घरगुती उपायांनी देखील नाहीसे होऊ शकतात. या स्ट्रेच मार्क्सवर नियमित पणे लिंबाचा रस आणि अलो वेराचा गर लावल्यास हे स्ट्रेच मार्क्स हलके होत जाऊन नाहीसे होतात.