गुळाच्या सेवनाने करा आरोग्याच्या तक्रारी दूर…


साखरेच्या ऐवजी गुळाचे सेवन आपल्या आरोग्याच्या दृष्टिने खूपच गुणकारी आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. पण गुळ हा केवळ नैसर्गिक स्वीटनर नाही, तर या व्यतिरिक्त देखील अनेक गुण गुळामध्ये आहेत. गूळ कॅल्शियम, जीवनसत्वे, क्षार, मॅग्नेशियम, पोटॅशियम या तत्वांनी परिपूर्ण असून गुळाला ‘ मेडिसिनल शुगर ‘, म्हणजे औषधी साखर असे ही म्हटले जाते. गुळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून, तब्येतीच्या लहानसहान तक्रारी गुळाच्या सेवनाने दूर करता येऊ शकतात.

जर तुम्हाला वारंवार सर्दी पडसे होत असेल, तर गूळ घालून केलेला काढा घेतल्याने सर्दी बरी होण्यास मदत मिळेल. हा काढा बनविण्यासाठी एक कप पाणी उकळत ठेवावे. गूळ पाण्यामध्ये विरघळू द्यावा. त्यानंतर या उकळत्या पाण्यामध्ये थोडे आले किसून घालावे. हा काढा चांगला उकळून थंड करून घ्यावा. का काढा दिवसातून तीन ते चार वेळा घेतल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते. घसा खराब होऊन खोकला येत असल्यास थोडी तुळशीची पाने घेऊन त्यांचा रस काढून घ्यावा. हा रस गुळामध्ये मिसळून त्याचे सेवन केल्याने खोकला कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे.

पुष्कळ महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी एक कप गरम दुधामध्ये थोडा गूळ घालावा, आणि हे दुध प्यावे. दिवसातून दोन वेळा गरम दुध आणि गुळाचे मिश्रण घ्यावे. मासिक पाळी सुरु होण्याच्या दोन दिवस आधीपासून दुध आणि गुळाचे मिश्रण सेवन केल्यास पाळीच्या दरम्यान पोटदुखीचा त्रास होणार नाही. तसेच अपचन झाल्यास गुळाच्या सेवनाने आराम पडू शकतो. ज्या व्यक्तींना नेहमी अपचन, अॅसिडीटी, पित्त या विकारांचा त्रास होतो, त्यांनी जेवणानंतर गुळाचा खडा खावा. जेवणानंतर ओव्याची पूड, धणे पूड, आणि गूळ असे मिश्रण घेतल्यानेही फायदा होतो.

वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास गूळ आणि तीळ समप्रमाणात घेऊन दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर बारीक वाटून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणामध्ये थोडेसे साजूक तूप किंवा तेल घालावे आणि ह्या मिश्रणाचा लेप कपाळावर लावावा. तसेच वॉटर रीटेन्शन होत असल्यास किंवा पावलांवर वारंवार सूज येत असल्यास एक चमचा गूळ, दोन चमचे बडीशेप २५० मिलीलीटर पाण्यामध्ये घालून उकळून घ्यावे. हे मिश्रण अर्धे होईपर्यंत उकळायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यावे. हे मिश्रण थोड्या थोड्या प्रमाणात दिवसातून अनेक वेळा घ्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment