ट्रेकिंगसाठी निघाला आहात का? त्यासाठी असे करा पॅकिंग…


सध्याचे हवामान आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेता ही वेळ ट्रेकला जाण्यासाठी अगदी ‘ आयडियल ‘ आहे. जर ट्रेक लहानसा असेल, तर त्यासाठी फार जंगी तयारी करण्याची गरज नाही. मात्र जर दोन ते तीन दिवसांच्या ट्रेकला जाणार आसल, तर त्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्ही जिथे ट्रेक साठी जाणार असाल, तेथील हवामानाचा अंदाज घ्या, व त्यानुसार आवश्यक ते कपडे बरोबर घ्या. ट्रेकमध्ये सर्व सामान तुमचे तुम्हाला उचलून चालायचे असेल, तर तुम्हाला कितपत वजन घेऊन चालणे शक्य होणार आहे याचा विचार अवश्य करा. कपडे असे असावेत, की जे हर तऱ्हेच्या हवामानासाठी योग्य असतील. तसेच ट्रेकला जाताना आपला विंड चीटर किंवा रेनकोट बरोबर ठेवायला विसरू नये. तसेच जास्तीचे अंडर गारमेंट देखील बरोबर असावेत.

ट्रेकसाठी असा बॅक पॅक निवडा, ज्यामध्ये तुमचे सर्व सामान अगदी सहज मावेल. ट्रेकला जाताना हात शक्यतो मोकळे असायला हवेत. त्यामुळे एकापेक्षा जास्त बॅग्स मध्ये सामान नेणे गैरसोयीचे ठरू शकते. तसेच, तुम्ही नेणार असलेले बॅक पॅक पाठीवर उचलून चालताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही हे पाहावे. तसेच ट्रेकच्या ठिकाणी अनेक चढ-उतार करावे लागत असल्याने चांगल्या प्रतीच्या शूजची निवड करणेही आवश्यक आहे.

ट्रेकला जाताना आपल्याबरोबर आवश्यक ती सर्व औषधे, गरज लागल्यास प्रथमोपचार करण्यासाठी आवश्यक सामग्री, आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी आणि सनग्लासेस असावेत. तसेच चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन, लिप बाम, आणि मॉईश्चरायझर बरोबर असणे देखील आवश्यक आहे. तसेच तुमच्याबरोबर चांगल्या प्रतीचा टॉर्च, हँड सॅनिटायझर, वेट वाइप्स, एखादा पेन नाईफ, यांसारख्या आवश्यक वस्तू बरोबर असायला हव्यात. आपल्या फोन साठी पावर बँक बरोबर नेण्यास विसरू नये.

Leave a Comment