चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका उभारणार 5जी नेटवर्क


सायबरविश्वात चिनी हॅकर्सकडून होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन अमेरिकेत नवीन देशव्यापी 5जी नेटवर्क उभे करावे, असा सल्ला सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.

ॲक्सिओस न्यूज या संकेतस्थळाने या संबंधातील कागदपत्रे मिळाल्याचा दावा करून हे वृत्त दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अधिकारी येत्या तीन वर्षांत अशा प्रकारचे 5जी नेटवर्क उभारण्याची योजना बनवत आहेत, असे या बातमीत म्हटले आहे.

अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि मेमो हाती लागल्याचा दावा या संकेतस्थळाने केला आहे. यात नवीन ५जी नेटवर्क तयार करण्यासाठी दोन मार्ग सुचवले असून त्यातील पहिला मार्ग हा देशातील खासगी नेटवर्कचे सरकारीकरण हा आहे.

या वृत्तावर चीनने साहजिकच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीन कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ले करत नाही आणि अमेरिकेने चीनचा आदर करायला हवा, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे.

नेटवर्क साहित्याचे उत्पादन आणि त्याचे संचालन यात चीनचे वर्चस्व पाहता अशा प्रकारचे उपाय अत्यंत आवश्यक आहेत. चीनकडून असलेल्या धोक्यापासून अमेरिकेचे आर्थिक व सायबर संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारचे उपाय गरजेचे असल्याचेही या मेमोत म्हटले आहे.

Leave a Comment