आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन


नवी दिल्ली – आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीसमोर या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण होणार आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी या पार्श्वभूमिवर विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

रविवारी केंद्र सरकारच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदीविधेयक संमत करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले. अर्थसंकल्पाआधीचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आर्थिक सर्वेक्षण सादर करणे. केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी १ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणार आहे, तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारीच दोन्ही सभागृहांत सादर केले जाणार आहे. गेल्या वर्षभरातील आर्थिक कामगिरीचा आढावा या अहवालात घेतला जातो.

Leave a Comment