‘डिजिटल वॉलेट’ बद्दल ही माहिती तुम्हाला असणे आवश्यक


डिजिटल वॉलेट किंवा ई-वॉलेट ची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये लोकप्रिय होत आहे. अचानक घोषित झालेल्या नोटबंदी नंतर ही संकल्पना जवळजवळ सर्वांकडूनच स्वीकारली गेली, आणि आता हीच संकल्पना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली आहे. ह्या ई-वॉलेट बद्दल काही मूलभूत गोष्टी जाणून घेऊ या.

ई-वॉलेट म्हणजे नेमके काय, तर हे तुमच्या पैशाच्या बटव्याचे डिजिटल रूपांतर म्हणता येईल. मात्र या डिजिटल वॉलेटमध्ये असणारी रक्कम ही ‘व्हर्च्युअल’ , किंवा अप्रत्यक्ष असते. अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास हे डिजिटल वॉलेट तुमच्या स्मार्ट फोन मध्ये एका ‘ अॅप ‘ च्या माध्यमात उपलब्ध असते. ह्या अॅप द्वारे तुम्हाला हव्या त्या सामानाची खरेदी करता येऊ शकते. ह्या डिजिटल वॉलेट द्वारे ग्राहकांना विमानप्रवासाठी किंवा रेल्वे प्रवासासाठी तिकिटे आरक्षित करता येऊ शकतात, आपल्या दररोजच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करता येऊ शकते, सिनेमाची तिकिटे बुक करता येऊ शकतात, ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते, आणि अनेक बिलांचे पेमेंट देखील करता येऊ शकते. इतकेच काय, तर आपण इतरांना देखील ह्या अॅप द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतो. मात्र या डिजिटल वॉलेट मध्ये रक्कम किती असावी याला निश्चित मर्यादा आहे.

हे ई-वॉलेट आपल्या फोन वर ‘इंस्टॉल’ करण्याकरिता अँड्रॉइड किंवा आयओएस च्या ऑनलाईन स्टोअर वर जाऊन हे मोबाईल अॅप डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर हे अॅप आपल्या फोनवर इंस्टॉल करावे. या ई-वॉलेट मध्ये पैसे जमा करण्याकरिता आपले डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंग चा वापर करावा. ई-वॉलेट मध्ये पैसे जमा करण्याकरिता सामान्यपणे कोणताही चार्ज आकारला जात नाही. पेमेंट करताना तुम्ही अॅप, एसएमएस, किंवा क्यू आर कोड स्कॅनिंग अश्या अनेक पर्यायांचा वापर करू शकता.

ह्या डिजिटल वॉलेट्सचा मुख्य फायदा असा, की याच्या वापरामुळे तुम्हाला तुमच्यापाशी रोख रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय डेबिट कार्ड्स किंवा क्रेडीट कार्ड्स न वापरताच तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्याबद्द्लची कोणतीही माहिती उघड होण्याची शक्यता कमी असते. या डिजिटल वॉलेट द्वारे तुम्ही अगदी लहान रक्कम ही भरू शकता. ही ई-वॉलेट्स ‘प्री-पेड’ असतात, म्हणजे यामध्ये तुम्ही त्याचा वापर करण्या आधीच पैसे जमा करावयाचे असतात. त्यामुळे ह्याचा वापर केल्यानंतर तुमचे पेमेंट ‘ डीक्लाईन’ होण्याचे, म्हणजेच नाकारले जाण्याची अजिबात शक्यता नसते. तसेच ई-वॉलेट्स चा वापर अतिशय सुरक्षित आहे. याद्वारे केल्या गेलेल्या प्रत्येक ट्रान्सॅक्शन नंतर ग्राहकाला एसएमएस द्वारे सूचना पाठविली जाते. मात्र या ई-वॉलेट बद्दलच्या डीटेल्स, किंवा पासवर्ड इतरांना सांगणे टाळायला हवे.

Leave a Comment