तुमचे क्रेडीट कार्ड व्यवहार का नाकारले जातात?


आजकालच्या डिजिटल युगामध्ये क्रेडीट कार्ड्स आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहेत. या क्रेडीट कार्ड्स मुळे आपल्याकडे रोख पैसे नसताना देखील खरेदी करण्याची मुभा आपल्याला मिळत असते. भारतीय सरकार तर्फे डिजिटल आणि कॅशलेस पेमेंट साठी जनतेला प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांमुळे बँकांच्या तर्फे क्रेडीट कार्ड्स जारी करण्यात येण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पण क्वचितप्रसंगी खरेदी केल्यानंतर क्रेडीट कार्ड ने पैसे भरताना आपली ट्रान्सॅक्शन ‘डिक्लाईन’ होते, किंवा नाकारली जाते. असे घडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

‘ट्रान्सॅक्शन फेल्युअर’ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुरेसे फंड्स नसणे हे आहे. आपण कोणत्याही प्रकारची ट्रान्सॅक्शन करीत असताना ती ट्रान्सॅक्शन आपल्या क्रेडीट च्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर बहुतेक ‘ इश्युअर ‘ ही ट्रान्सॅक्शन पूर्ण करीत नाहीत. हे टाळण्यासाठी वेळोवेळी आपल्या क्रेडीट कार्ड्स ची स्टेटमेंट तपासून पहावीत, आणि जे रक्कम चुकती करावयाची असेल, ती करावी. असे न केल्यास क्रेडीट लिमिट कमी होते, व जर क्रेडीट कार्डच्या बिलांची रक्कम भरली गेली नाही, तर कार्ड ब्लॉक होण्याची देखील शक्यता असते. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपले क्रेडीट लिमिट जितके असेल, त्यापेक्षा जास्त रकमेची खरेदी एका वेळी करणे टाळावे.

ऑनलाईन खरेदी करताना किंवा ईएमव्ही ट्रान्सॅक्शन करण्यासाठी ‘ ऑथेंटीकेशन ‘, महाजेच ‘ पिन’ आवश्यक असतो. हा पिन जर अयोग्य असेल, तर आपण करीत असलेली ट्रान्सॅक्शन पूर्ण होऊ शकत नाही. अनेक वेळी जर नव्याने कार्ड वापरले जात असेल, तर पिन नंबरच्या बाबतीत गडबड होण्याची शक्यता असते. अनेक वेळी सातत्याने चुकीचा पिन टाकल्याने कार्ड ब्लॉक होण्याची शक्यता असते. बँकांकडून जेव्हा क्रेडीट कार्ड दिले जाते,तेव्हा त्याच्यासोबत पिन नंबर देखील दिला जातो. हा पिन नंबर त्वरित बदलून आपल्याला सहज लक्षात राहील असा पिन नंबर बदलून घेणे आवश्यक आहे. हा पिन नंबर कार्डवर लिहून ठेवणे, किंवा इतर कोणाला सांगणे टाळायला हवे.

बँकांतर्फे केल्या जाणाऱ्या ‘फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट’ मुळे देखील क्वचितप्रसंगी आपले कार्ड ब्लॉक होऊ शकते, आणि त्यामुळे आपण करीत असलेली ट्रान्सॅक्शन नाकारली जाऊ शकते. बँकांतर्फे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स तर्फे क्रेडीट कार्ड्सचा वापर सतत नजरेखालून घातला जात असतो. कार्ड वापरण्याच्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल आढळून आल्यास, किंवा कोणतीही संदेहजनक कृती आढळल्यास बँकांच्या वतीने क्रेडीट कार्ड्स ब्लॉक केली जाऊ शकतात. असे करणे खरे तर ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ऐनवेळी कार्ड्स लॉक झाल्याने ग्राहकांना मात्र त्रास होतो. असे होऊ नये यासाठी ग्राहकांनी देखील काळजी घ्यायला हवी. एरव्ही जर तुम्ही कार्डवरून लहानसहान वस्तूंची खरेदी करीत असाल, आणि अचानक तीन चार मोठमोठ्या ट्रान्सॅक्शन तुमच्या कार्डवरून केल्या गेल्या, तर ही गोष्ट ‘इश्युअर्स’ करिता धोक्याच्या घंटेसमान असू शकते.

Leave a Comment