चुकीच्या वेळीस इंजेक्शन दिल्यामुळे गळा दाबण्याचा प्रयत्न!


रुग्णाला चुकीच्या वेळीस इंजेक्शन दिल्यामुळे नर्सचा गळा दाबण्याचा प्रयत्नकरणाऱ्या भारतीय मूळ असलेल्या डॉक्टरला अमेरिकेत पोलिसांनी अटक केली आहे.

वेंकटेश सास्तकोणार असे या 44 वर्षांच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी सर्जनचे नाव आहे. त्याने इलॅस्टिकने आपल्या नर्सचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र वेंकटेशने आपल्या वकिलामार्फत या आरोपांचा इन्कार केला असून ही घटना अतिरंजित स्वरूपात मांडल्याचे म्हटले आहे. या नर्सला इजा करण्याची माझ्या पक्षकाराची इच्छा नव्हती. वेंकटेश व ही नर्स हे गेल्या 10 वर्षांपासून मित्र असून त्या इलॅस्टिकची तार नर्सच्या त्वचेला स्पर्शही करू शकली नव्हती, असे वेंकटेशचे वकील मेल्विन रोथ यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्कमधील नासाउ यूनिवर्सिटी मेडिकल सेंटर येथे वेंकटेश हा वजन कमी करण्याचा तज्ञ आहे. तेथेच 22 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर नासाउ यूनिवर्सिटी मेडिकल सेंटरने वेंकटेशला निलंबित केले. त्याला मंगळवारी 3,500 डॉलर रोख रकमेच्या जामीनावर सोडण्यात आले.

आपल्या 51 वर्षीय नर्सचे जीवन धोक्यात घालण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. वेंकटेश नर्सच्या मागून आला आणि त्याने आपल्या स्वेटशर्टमधून इलॅस्टिक काढली आणि व त्याने नर्सचा गळा आवळला, असे अधिकृत तक्रारीत म्हटले आहे. त्याने या नर्सला धमकी दिली आणि ‘‘मी यासाठी तुझी हत्या करू शकतो,’’ असे नर्सने म्हटले आहे. मात्र पोलिसांनी या नर्सचे नाव उघड केलेले नाही.