असफलतेचा सामना करणे मुलांना शिकविणे महत्त्वाचे


आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा अवतरली आहे. अगदी मुले देखील या स्पर्धेच्या जगापासून लांब नाहीत. परीक्षेतील मार्कांमध्ये स्पर्धा, खेळांमध्ये स्पर्धा, कलागुण दर्शनामध्ये स्पर्धा, सर्वच बाबतीत मुलांना स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. आपण कोणत्याही बाबतीत मागे पडू नये यासाठी मुले मन लाऊन प्रयत्न करीत असतात. पालक देखील आपली जबाबदारी पार पडत शक्य त्या सर्व प्रकारे मुलांना पाठींबा देत असतात. पण क्वचितप्रसंगी मुलांना अपेक्षित असणारे यश मुलांना लाभत नाही. त्यावेळी मुले हिरमुसली होतात, त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. अश्या वेळी पालकांनी मुलांना असफलतेचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. तसेच मिळालेल्या असफलतेने निराश न होता, त्यातून काही तरी नवीन शिकत स्वतःमध्ये सुधारणा करण्यास प्रवृत्त करायला हवे.

मुलांना, ते करीत असलेल्या परिश्रमांचे आणि प्रयत्नांचे महत्व समजावून सांगायला हवे. तसेच त्यांना अपेक्षित असणारे यश न मिळाल्याने निराश न होता, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे. त्यामुळे मुले कमी पडली तरी त्यांना आणखी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळेल, व त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. जर प्रयत्नांमध्ये मुले कमी पडत असतील, किंवा त्यांच्या हातून काही चुका घडत असतील, तर त्या चुका मुलांना समजावून देऊन, त्या सुधारण्यास त्यांना मदत करावी.

मुले अयशस्वी होत असतील, तर ती यशस्वी होण्यासाठी त्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. मुले करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये उणीवा शोधून काढण्यापेक्षा, त्यांची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मुले करीत असलेल्या प्रयत्नांवर प्रतिक्रिया देताना विचार करून बोलावे. मुलांचा आत्मविश्वास ढासळेल असे बोलणे टाळावे. तसेच, इतरांशी मुलांची तुलना करणे टाळावे.

मुलांची असफलता, स्वतःची व्यक्तिगत असफलता असल्यासारखे काही पालक वागतात. ते स्वतः अस्वस्थ होतातच, आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यापायी मुलांना वाटेल तसे बोलून मुलांचे मानसिक खच्चीकरण करताना दिसतात. असे न करता, सफलता किंवा असफलता हे जीवनाचे महत्वाचे भाग असून ह्याचा सामना आत्मविशावासाने कसा करायला हवा, हे मुलांना समजावून सांगायला हवे. येणाऱ्या काळामध्ये मुले करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये पालक म्हणून आपण ही मुलांना सर्वतोपरी सहाय्य करावे. प्रयत्नांच्या प्रत्येक पायरीवर मुलांचे कौतुक करावे आणि त्यांना प्रोत्साहन देत राहावे.

Leave a Comment