घर विकत घेणार आहात का? मग हा ‘होमवर्क’ अवश्य करा


जर तुम्ही स्वतःचे पहिले वहिले घर विकत घेण्याबद्दल विचार करीत असाल, तर तत्पूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. घर विकत घेण्याचा दृष्टीने आपण अनेक घरे पाहत असतो. पण ही घरे पाहत असताना अनेक गोष्टी बारकाईने पाहण्याची गरज असते. तसेच री-सेल चे घर घेत असताना, मूळ घर मालकाकडून सर्व गोष्टींचा खुलासा करून घेणे आवश्यक आहे.

आपण खरेदी करणार असलेले घर अनके वेळा डोळ्याखालून घालावे. शक्य असल्यास दोन तीन दिवसांमध्ये दिवसाच्या निरनिराळ्या वेळी घराची पाहणी करावी. त्यामुळे घरामध्ये नैसर्गिक उजेड, वारा, याचबरोबर घर उन्हामध्ये किती तापते या गोष्टींचा अंदाज येतो. शक्य असल्यास आपल्यासोबत एखाद्या स्ट्रक्चरल इंजिनियरला ही घेऊन जावे. हा इंजिनियर बांधकामातील स्ट्रक्चरल उणीवा अचूक हेरु शकतो. तसेच आपण पाहत असलेल्या घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांशी चर्चा करून इतर कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत किंवा नाहीत याबद्दल माहिती करून घ्यावी.

आपण ज्या प्रोजेक्ट मध्ये घर बघत असू, तिथे आसपास भविष्यामध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत किंवा नाही याचा विचार करावा. आपण जे घर पहात आहात, तिथे सर्व मूलभूत सुविधा घरच्या जवळ उपलब्ध आहेत का, किंवा सध्या नसतील तर भविष्यात उपलब्ध होणार आहेत का, या बद्दल चौकशी करावी. रोजच्या गरजेच्या वस्तू, म्हणजे दूध, भाज्या, औषधे इत्यादी जवळपास उपलब्ध आहेत किंवा नाही हे पाहावे. तसेच येण्या-जाण्याच्या दृष्टीने घर कितपत सोयीचे आहे हे अवश्य पाहावे.

आपण जे घर पाहत असू, ते जर एखाद्या रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स मध्ये असेल, तर तिथे वाहन उभे करण्याची कशी काय सोय आहे, हे अवश्य पाहावे. आजकाल नव्या रेसिडेंशीयल कॉम्प्लेक्सेस मध्ये प्रत्येक घरासाठी पार्किंग स्लॉटची व्यवस्था केलेली असते, पण जर आपण पाहत असलेले घर री-सेलचे असेल, तर पार्किंग ची व्यवस्था पाहून घ्यावी. तसेच रेसिडेंशीयल कॉम्प्लेक्स मध्ये कोणकोणत्या सोयी दिल्या गेल्या आहेत हे पाहून घ्यावे.

आजकाल घराच्या खरेदी-विक्रीसाठी अनेक ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध आहेत. या वेबसाईट्स वर नोंद असलेल्या घरांची पाहणी वेबसाईट्सच्या प्रतिनिधींच्या द्वारे आधीच केलेली असते. त्यामुळे आपला खूप वेळ वाचू शकतो. त्यामुळे ह्या वेबसाईट्सद्वारे देखील अनेक घरांचे पर्याय आपल्याला घर बसल्या उपलब्ध होऊ शकतात. तसेच आपण पाहत असलेले घर ज्या भागामध्ये असेल, तिथल्या घरांच्या किंमती देखील ऑनलाईन सर्च करून, तुम्ही पाहत असलेल्या घराच्या किंमतीचा साधारण अंदाज तुम्ही घेऊ शकता.

Leave a Comment