धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये उत्तर प्रदेशातील महिला आघाडीवर


धूम्रपान किंवा मद्यपान ह्या सवयी पुरुषांमध्ये जास्त प्रमाणावर आढळतात ही समजूत चुकीची ठरू लागली आहे. त्याचबरोबर धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या महिला केवळ मोठ्या शहरांमध्येच आढळतात, ही समजूत देखील चुकीची ठरते आहे. अलीकडेच केलेल्या रिसर्चमध्ये एक वेगळेच चित्र समोर आले आहे. या रिसर्चनुसार उत्तर प्रदेशातील महिला धूम्रपानाच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहेत. ग्लोबल अॅडल्ट सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशातील दर सहा महिलांमध्ये एक महिला धूम्रपान करताना आढळते.

ग्लोबल अॅडल्ट सर्व्हेमध्ये पंधरा वर्षान्च्यावरील सर्व व्यक्तींना सहभागी केले गेले. या सर्व्हेसाठी केंद्रीय परिवार कल्याण विभाग, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आणि मुंबई येथील टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस तर्फे एक ‘मल्टी स्टेज सँपल डिझाईन’ तयार केले गेले. या प्रयोगामध्ये संपूर्ण देशभरामधील एकूण ७४,०३७ व्यक्ती आणि केवळ उत्तर प्रदेशातील १,६८५ पुरुष आणि १,७७९ महिलांना सहभागी केले गेले. ह्या सर्व्हेनुसार गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश मध्ये धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या संख्यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

या सर्व्हेच्या रिपोर्टनुसार उत्तर प्रदेशातील दर सहा महिलांमध्ये एक महिला कुठल्या ना कुठल्या प्रकारे तंबाखूचे सेवन करीत असते. महिला गुटखा, तंबाखू, बीडी, सिगारेट अश्या अनेक प्रकारांच्या माध्यमातून तंबाखूचे सेवन करीत आहेत. यामध्ये गुटखा, पानमसाला या पदार्थांचे सेवन करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. उत्तर प्रदेशाप्रमाणेच त्रिपुरा, आणि मिजोरम या राज्यांमध्ये देखील महिला धूम्रपान करण्यात आघाडीवर आहेत.

उत्तर प्रदेशातील महिला धूम्रपानाच्या इतक्या जास्त आहारी गेल्या आहेत, की काही महिलांना तर सकाळी जाग येता क्षणीच धूम्रपान करण्याची सवय आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य मंत्र्यांनी महिलांच्या या धूम्रपानाच्या सवयीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Comment