अमेरीकेत झालेल्या वाचन आणि आकलनाच्या एका उच्च पातळीच्या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बसविलेल्या यंत्रांनी मानवांवर मात केली आहे. अलीकडेच घेण्यात आलेल्या या चाचणीत दोन नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधनांना मानवांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांची वाचनाच्या स्पर्धेत मानवांवर मात
यातील एक साधन हे मायक्रोसॉफ्ट या अमेरीकी सॉफ्टवेअर कंपनीने तयार केले असून दुसरे साधन अलीबाबा या चिनी ऑनलाईन विक्री कंपनी तयार केले आहे.
या यंत्राच्या यशाबद्दल अलीबाबा कंपनीने या महिन्याच्या सुरूवातीला माहिती दिली होती. आपल्या इन्स्टिट्यूट ऑफ डाटा सायन्स ऑफ टेक्नॉलॉजिसने विकसित केलेल्या वाचन आकलन चाचणीमध्ये मॉडेलने प्रथमच मानवापेक्षा जास्त गुण मिळविल्याचे कंपनीने म्हटले होते.
कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी ही चाचणी तयार केली असून स्टॅनफोर्ड क्वश्चन अॅन्स्वरिंग डाटासेट असे तिला म्हणतात.
या चाचणीत 100,000 पेक्षा अधिक प्रश्न आणि उत्तरे आहेत. विकिपीडिया संकेतस्थळावर असलेल्या 500 पेक्षा अधिक माहितींवर ते आधारित आहेत.या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचन साहित्यात येतात.
मोठ्या प्रमाणावरील माहितीवर प्रक्रिया केल्यानंतर प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतात का, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या यंत्रांची चाचणी घेण्यात आली.