जाणून घेऊ या दाव्होस शहराबद्दल…


‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ मुळे सध्या चर्चेत असलेल्या दाव्होस या स्वित्झर्लंड मधील शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती, तेथील मनोरम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मोदीजींची ‘सेल्फी ‘, दाव्होसच्या संमेलनामध्ये अभिनेता शाहरुख खानचे भाषण, या सर्व गोष्टींमुळे दाव्होस शहर हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या शहराविषयी माहिती, खास माझ्या पेपरच्या वाचकांसाठी.

स्वित्झर्लंड मधील दाव्होस हे शहर एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. विंटर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण अतिशय लोकप्रिय आहे. समुद्रपातळी पासून ५१२० फुटांच्या उंचीवर असलेले हे शहर युरोपमधील सर्वात जास्त उंचीवर वसलेले शहर आहे. दाव्होस युरोपमधील सर्वात मोठे नैसर्गिक ‘ आईस रिंक ‘ आहे, त्यामुळे येथे सर्वाधिक प्रमाणात ‘आईस प्ले’ आयोजित होत असतात. आईस हॉकी, स्केटिंग, स्की लिफ्ट्स, स्की स्लोप्स, बेव्हेरीयन कर्लिंग इत्यादी खेळांचे आयोजन इथे होत असते. हे शहर युरोपमधील सर्वात मोठे स्की रिसोर्ट देखील आहे. दरवर्षी येथे आईस हॉकी स्पर्धेचे आयोजन केले जाते. दाव्होस लोकल हॉकी टीम तर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

दाव्होस शहर स्वित्झर्लंड मधील वासर नदीच्या किनारी वसलेले आहे. स्विस आल्प्स पर्वतराजीतील प्लेसुर आणि अल्बुला पर्वतश्रुखालांनी हे शहर वेढलेले आहे. दर वर्षी वर्ल्ड इकोनॉमिक फोरम चे सम्मेलन या शहरामध्ये भरत असते. या सुंदर शहराची जनसंख्या केवळ ११,००० आहे. २८४ किलोमीटर विस्तारामध्ये हे शहर पसरलेले असून, या पैकी केवळ २.३ टक्के जागेवर रस्ते आणि इमारती बनल्या आहेत. या शहरामध्ये अनेक रिसोर्ट बनले आहेत. सुट्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये ही रिसोर्ट अतिशय लोकप्रिय आहेत.

झ्युरीच या शहरातील विमानतळ दाव्होसच्या सर्वात जवळ असणारा विमानतळ आहे. झ्युरीचपर्यंत विमानाने जाऊन, त्यापुढे बस किंवा ट्रेनने दाव्होसपर्यंत जाता येते. झ्युरीच पासून दाव्होस पर्यंतचे अंतर सुमारे १६० किलोमीटर आहे. दाव्होस मध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये किर्शनर म्युझियम या ठिकाणी वास्तुकलेमधील उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात, तर विंटर स्पोर्ट्स म्युझियम मध्ये विंटर स्पोर्ट्सशी संबंधित सर्व सामग्री पाहता येते. झ्युगेनश्लुष्ट येथे रेल्वे लाईन आणि मायनिंग म्युझियम पाहता येते, तर शाट्सआल्प हे अतिशय सुंदर बॉटॅनिकल गार्डन येथे आहे.

दाव्होस य शहरामध्ये दरवर्षी पाच दिवसांसाठी वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ची बैठक होत असते. या बैठकीमध्ये व्यापार, कला, राजनीति, शिक्षण आणि इतरही अनेक क्षेत्रांमधील नामवंत व्यक्ती सहभागी होत असतात.

Leave a Comment