हृदयविकार टाळण्यासाठी


आजकाल हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. ही वाढ ज्या कारणांनी होत आहे ती कारणे तर सामान्य आहेत. त्यामुळे त्या कारणांना जन्म देणारी जीवनपद्धती जशी जशी रूढ होत आहे तसे तसे हृदयविकाराचे रूपांतर साथीत होते की काय असे वाटायला लागले आहे. बहुतेक लोक कोणत्याही क्षणी या विकाराला बळी पडण्याची जोखीम घेऊन जगत आहेत. हृदयविकार तज्ज्ञांना मात्र असे जगणे टाळता येऊ शकेल याची खात्री वाटत आहे. त्यासाठी करायची उपाययोजना अगदी साधी आहे. दर आठवड्याला किमान तीन ते चार दिवस अर्धा तास व्यायाम करायचा आहे. तो केला की हृदयविकाराची एवढी दहशत मानण्याची गरज नाही असे या तज्ज्ञांचे मत आहे.

रक्तवाहिन्यात ब्लॉक्सचा अडथळा निर्माण होणे हा हृदय विकाराचा प्रकार आहेच पण शेवटी तो होतो तेव्हा जे काही घडते ते सर्वत्र सारखेच आहे. शरीराला रक्ताचा पुरवठा करणे हे हृदयाचे काम असते. ते काम हृदय पंपासारखे काम करून बजावत असते. मात्र पंपाचे स्नायू दुबळे होऊन त्याची पंपिंगची ताकद कमी झाली ती शरीराच्या निरनिराळ्या अवयवांना रक्त मिळत नाही. रक्ताचे पंपिंग होण्याऐवजी ते फुफ्फुसातच परत येते आणि रक्तपुरवठ्याच्या अभावामुळे झटका येतो. म्हणून डॉक्टर मंडळी हृदयाची पंपिंग करण्याची क्षमता टिकवण्याचा सल्ला देतात आणि त्यासाठी व्यायाम करण्याची सूचना करीत असतात.

रक्ताचे पंपिंग करण्याचे काम सुरू असते हे त्याच्या धडधडीतून जाणवत असते. शरीराच्या एखाद्या अवयवाला रक्ताची जास्त आवश्यकता असेल तेव्हा ही धडधड वाढते. हृदय सर्वात अधिक वेगाने धावते तेव्हा ही धडधड पराकोटीला जाते. तेव्हा व्यायाम करताना हृदयाच्या या कमाल वेगाच्या ९५ टक्के एवढ्या वेगाने ते पळत राहील एवढा व्यायाम केला पाहिजे. या वेगाने ते चार मिनिटे पळत रहावे. म्हणजे ही या वेगाची अवस्था चार मिनिटे टिकावी. नंतरच्या तीन मिनिटात पुन्हा पूर्ववत अवस्था यावी. आता आपल्या हृदयाची ही अवस्था येणे हाच व्यायाम आहे. तो कोणत्या प्रकाराने यावा याला काही महत्त्व नाही. तो चालून येतो, पळून येतो आणि खेळूनही येतो. आपण कोणता प्रकार अवलंबायचा आहे हे आपल्या सोयीने ठरणार आहे. प्रकार कोणताही असो. ही अवस्था आणि हृदयाला होणारा व्यायाम हे झाले की काम भागले. हा व्यायाम आठवड्यातून तीन ते चार वेळा झाला पाहिजे.:

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment