मागील २२ वर्षांपासून ब्राझीलच्या रिओ द जनेरो शहरातील एक व्यक्ती जगापासून अलिप्त एका वाळूच्या महालात राहत असून ४४ वर्षीय मार्कियो मिझेल माटोलीस स्वतःला राजा समजतात. त्यात भर म्हणजे त्यांच्या जवळपास राहणारे काही लोक त्यांना राजा म्हणून संबोधतात तर काही लोक त्यांना पाहून सनकी म्हणतात.
मार्कियोने आपल्या अनोख्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या. आपल्याला समुद्र खूप आवडतो असे मार्कियोने सांगितले. अशा बीचवर राहण्यासाठी लोक भरपूर पैसा खर्च करतात, घर विकत घेतात आणि मी येथेच हा आनंद घेतो. यामुळे मी या वाळूच्या महालात राहत आहे. मार्कियो या बीचवर येणाऱ्या पर्यटकांसाठी एखाद्या सेंटर ऑफ अट्रेक्शनपेक्षा कमी नाही. या महालाच्या बाहेर डोक्यावर मुकुट घालून शाही खुर्चीवर हे बसून असतात.
मार्कियोने सांगितले की, त्याला दररोज आपला हा वाळूचा महाल सुरक्षित ठेवण्यासाठी यावर पाणी शिंपडावे लागते. या महालाची तो दिवसरात्र डोळ्यात तेल घालून देखरेख करतो.
मार्कियो जवळपास राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, आम्ही खूप वर्षांपासून मार्कियोला येथे राहत असल्याचे पाहत आहोत. त्याला हे लोकही ‘द किंग’ म्हणतात. लोकांनी सांगितले की, मार्कियो फक्त तीन गोष्टी करत आपले आयुष्य जगत आहे, मासे पकडणे, पुस्तक वाचणे आणि गोल्फ खेळणे.