सोशल मीडियामुळे लोकशाहीला धोका – फेसबुकची कबुली


भविष्यात सोशल मीडिया हा लोकशाहीसाठी धोका ठरू शकतो, असे सोशल मीडियाची प्रमुख कंपनी असलेल्या फेसबुकनेच म्हटले आहे.

वर्ष 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया कंपन्यांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची खोटी माहिती पसरविण्यापासून थांबविण्यात अपयशी ठरल्याची टीका फेसबुकवर मुख्यत्वे करण्यात येत होती.

“इंटरनेट कोणत्याही सुरळीत चालू असलेल्या लोकशाहीला नुकसान करू शकते, हे कंपनी समजू शकते,” असे फेसबुकचे वरिष्ठ अधिकारी समिध चक्रवर्ती यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

या प्लॅटफॉर्मचा वापर काही लोक शिविगाळ आणि द्वेष पसरविण्यासाठी करतील, हे समजण्यास फेसबुकला वेळ लागला, हे कंपनीने मान्य केले आहे.

“नकारात्मक कारणांशी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच आमचे व्यासपीठ निर्विवादपणे लोकशाहीसाठी उत्तम स्रोत राहील, याची निश्चिती आम्ही करू,” असे फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स अँड गव्हर्नमेंट आऊटरीच प्रमुख केटी हारबैथ यांनी सांगितले.

आमच्या व्यासपीठाचा वापर कोणी सायबर युद्ध आणि समाजाला विभाजित करण्यासाठी करावा, हे आमच्यासाठी अत्यंत वाईट आहे, असे समिध चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

Leave a Comment