नक्कीच पहावा असा ‘पद्मावत’


बहुसंख्य वादविवादात झाल्यानंतर अखेर संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतीक्षित पद्मावत चित्रपट बॉक्सऑफिसवर झळकला आहे. भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट सिनेरसिकांना भुरळ घालणार एवढे मात्र नक्की. तुमच्यापर्यंत या चित्रपटातील प्रत्येक पात्र थेट कसे पोहचेल, याची पुरेपुरे काळजी भन्साळी यांनी घेतली आहे.

चित्रपटातील अलाउद्दीन खिलजीपासून ते राजा रतन सिंह आणि राणी पद्मावती या सर्व भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. या सर्व पात्रांचा विचार चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटागृहातून बाहेर पडल्यानंतरही तुमच्या डोक्यात सुरूच राहणार आहेत.

मलिक मुहम्मद जायसी यांनी लिहिलेल्या कथेवर ‘पद्मावत’ आधारित असल्याचे चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये राजपूत समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, अशी कोणतीही गोष्ट चित्रित करण्यात आलेली नाही. चित्रपटाची कहाणी राजा रतन सिंह यांच्या आयुष्यावर आधारीत असून पद्मावतीवर राजा रतन सिंह यांचे प्रेम जडते. यानंतर पद्मावती चित्तोडची राणी बनते. पण राणी पद्मावतीविरोधात एक जण अलाउद्दीन खिलजीला भडकवतो आणि चितौडचा बदला घेण्यास भाग पाडतो.

अलाउद्दीन आणि राणी पद्मावती या व्यक्तीरेखांना चित्रपटामध्ये कुठेही एका फ्रेममध्ये दाखवण्यात आलेले नाही. सुरुवातीपासून ते चित्रपटाचा शेवट होईपर्यंत चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना आपल्यासोबत बांधून ठेवते. अत्यंत उत्कृष्ट आणि कमाल पद्धतीने चित्रपटाची कहाणी संजय लीला भन्साळी यांनी मोठ्या पडद्यावर मांडली आहे. चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजी या नकारात्मक भूमिकेत रणवीर सिंह आहे, पण तरीही त्यानेच संपूर्ण चित्रपटात भाव खाल्ला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातील संगीत आणि गाणीदेखील तितकीच तगडी असतात.

सर्वांनीच चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला आहे. अलाउद्दीन खिलजीची जिवंत व्यक्तीरेखा रणवीर सिंहने मोठ्या पडद्यावर साकारली आहे. रणवीरची चित्रपटातील स्टाईल, भूमिकेतील क्रूरपणा, त्याची एनर्जी हे पाहिल्यावर तुम्ही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. एकाच व्यक्तीरेखेचे निरनिराळे पैलू रणवीरने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडले आहेत. राणी पद्मावतीची एक झलक पाहण्यासाठी जगातील प्रत्येक गोष्टीवर कब्जा करणाची इच्छा बाळगणारा अलाउद्दीन खिलजी शेवटपर्यंत तळमळत राहतो. राजा रतन सिंह यांची भूमिका शाहिदने अगदी चोख वटवली आहे. आपल्या अभिनयाने, चेह-यावरील हावभावांनी राजा रतन सिंह यांच्या व्यक्तीरेखेत शाहिदने अक्षरशः जीव ओतल्याचे दिसत आहे.

तसेच चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिका आहे राणी पद्मावतीची. पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण अप्रतिम दिसत आहे. दीपिका सिंहल द्वीपची शिकार करणारी पद्मावती असो किंवा चित्तौडची राणी सा, प्रत्येक दृश्यांमध्ये कमाल दिसली आहे. दीपिकाचा जौहर जाण्याचा सीन पाहताना अंगावर काटा उभा राहतो. एकूण दीपिकाच्या अभिनयाला तोडच नाही. या चित्रपटाचे बजेट १८० कोटी रुपये एवढे आहे. सिनेचाहत्यांना भन्साळींचा ‘पद्मावत’देखील मोहिनी घालणार यात काही वादच नाही. त्यामुळे ‘पद्मावत’ हा चित्रपट नक्कीच पाहा.