वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांशी स्पर्धा येते तेव्हा…


वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नींची एकमेकांशी असलेली स्पर्धा काही बाबतीत दोघांसाठी यशस्वी ठरत असते, पण या साठी परस्परांना समजून घेणे आवश्यक आहे. काही बाबतीत मात्र ही स्पर्धा पती पत्नींचे परस्पर संबंध बिघडविणारी ठरू शकते. जर ही स्पर्धा आरोग्याविषयी असेल, तर ह्याचा परिणाम सकारात्मकच होताना दिसतो. पण अडचण तेव्हा उद्भविते, जेव्हा पती पत्नी मधील एकाला व्यायामाची आवड असते, आणि दुसऱ्याला ती आवड अजिबात नसते. अश्या वेळी आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला सतत त्याबद्दल टोचून बोलत न राहता, जोडीदाराला प्रेरणा देत राहावे. आपल्या जोडीदाराने विशिष्ट प्रकारचाच व्यायाम करावयास हवा, हा आग्रह टाळावा. ज्याने त्याने आपल्या पसंतीची व्यायामपद्धती निवडावी, एकाची व्यायामपद्धती दुसऱ्यापेक्षा चांगली कशी ही स्पर्धा टाळावी.

आरामदायक जीवनासाठी पती आणि पत्नी दोघेही नोकरी, व्यवसाय करताना दिसू लागले आहेत. त्यामधून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाची तुलना किंवा स्पर्धा होणे, हे मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी घातक ठरू शकते. या बाबतीत पती-पत्नींनी समजूतदारपणा दाखवायला हवा. कोणाची मिळकत कमी, किंवा कोणाची जास्त ह्यावरून पतीपत्नींनी परस्परांची योग्यता ठरवू नये.

संसार म्हटला की त्यामध्ये अनेक चढ उतार हे आलेच. प्रत्येक पती-पत्नी आपल्या संसारासाठी, मुलांसाठी आणि इतर नाती जपण्यासाठी देखील अनेक लहान मोठे त्याग करीत असतात. पण त्यासाठी एकमेकांना दोषी मानत, कोणी कोणापेक्षा जास्त त्याग केला, ही स्पर्धा टाळावी. ह्या गोष्टींमध्ये तुलना खरे तर करताच येत नाही. तसेच एकमेकांच्या परिवारजनांसाठी केलेली लहान मोठी कामे देखील वादविवादासाठी कारणीभूत ठरू शकतात. आपले परिवारजन हे पती आणि पत्नी, या दोघांची जबाबदारी असतात. त्यामुळे एकमेकांच्या परिवारासाठी केलेले त्याग हा स्पर्धेचा विषय ठरू देऊ नयेत.

Leave a Comment