विचारसरणी सकारात्मक होण्यासाठी…


काही व्यक्ती नेहमी आनंदी असतात. हा आनंद त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीत म्हणून आलेला नसतो, तर जीवनामध्ये अडचणी आल्यानंतरही त्यांचा मोठ्या धैर्याने सामना करणाऱ्या या व्यक्ती असतात. आयुष्यामध्ये कितीही बरे वाईट प्रसंग आले, तरी या व्यक्तींची सकारात्मक विचारसरणी त्यांना आयुष्याचे प्रत्येक वेडेवाकडे वळण समर्थपणे पार करण्याची ताकद देत असते. विचारसरणी सकारात्मक होण्यासाठी काही गोष्टी आचरणात आणण्याची गरज आहे.

तुमच्याकडे असलेल्या वस्तूंच्या बाबतीत, तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याबद्दल तुम्ही समाधानी राहण्याचा प्रयत्न करायला हवा. आहे ती परिस्थिती जर आपल्या मनासारखी नसेल, तर ती प्रयत्नपूर्वक बदलता येऊ शकते. त्यामुळे परिस्थितीबद्दल सतत तक्रार न करीत बसता, आपल्या प्रयत्नांनी आपल्या आसपासचे वातावरण बदलता येऊ शकते. तसेच ज्या व्यक्ती जगाकडे किंवा परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात, त्यांना सतत काही तरी नवे करून दाखविण्यासाठी संधी सतत मिळत राहतात. येणारी परिस्थिती ही नेहमी नवीन संधी घेऊन येत असते, अशी विचारसरणी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

आपल्या आसपासच्या व्यक्तींबद्दल खूप जास्त विचार करून त्यांच्याशी सतत तुलना करीत राहू नये. इतरांशी केलेली तुलना, तुमच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचविणारी ठरू शकते. जर तुलना करायचीच असेल, तर स्वतःशीच करावी. मागील काही काळामध्ये तुमच्यात किती आणि कसा बदल झाला आहे, त्याचे तुम्हाला कसे फायदे होत आहेत, यावर विचार करावा, आणि भविष्यात स्वतःमध्ये अजून किती आणि कसे बदल करायला हवेत, ह्याबद्दल विचार करावा. ज्यांना तुमच्या मदतीची गरज असेल, त्यांना निस्वार्थ भावाने मदत करा. आपण केलेल्या प्रत्येक मदतीचा मोबदला आपल्याला आर्थिक स्वरूपात मिळेलच असे नाही, पण आपण लावलेल्या छोट्याशा हातभाराने इतरांची अडचण दूर होऊ शकली, हे समाधानही फार मोठे असते.

जर एखाद्यामुळे आपले थोडेफार नुकसान झाले असले, तरी त्यांच्याबद्दल मनामध्ये कोणत्याही प्रकारची तिरस्काराची भावना मनामध्ये न बाळगता, त्या व्यक्तीला मोठ्या मनाने क्षमा करण्याचा प्रयत्न करा. एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये असलेली रागाची किंवा द्वेषाची भावना आपल्यासाठी मानसिक तणावाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे ह्या तणावापासून दूर राहण्यासाठी ह्या गोष्टींचे ओझे स्वतःच्या मानावर बाळगण्याचे टाळा.

Leave a Comment