द गोल्डन चॅरीयटवर फेरफटका


कधी तरी रोजच्या धावपळीच्या चाक्रमधून बाहेर पडून कुठे तरी लांब जावे, काही तरी नवीन करावे अशी अनिवार इच्छा होते. पण सुट्टीवर जायचे म्हणजे परिवारातील सर्वांच्याच सुट्ट्या आणि वेळ जमायला हवा, कुठे जायचे यावर एकमत व्हयला हवे. या कारणांसाठी बहुतके वेळी सुट्टीचा कार्यक्रम रद्द तरी होतो, आणि पार पडलाच तरी काही तरी वेगळ्या अनुभवाचे समाधान देऊन जातोच असे नाही.

त्यामुळे पुढच्या वेळी सुट्टी प्लॅन करताना आणि काही तरी वेगळा अनुभव घ्यायची इच्छा असल्यास, ‘द गोल्डन चॅरीयट ‘ या ट्रेनचे बुकिंग करा आणि सात रात्री आणि आठ दिवसांच्या फेरफटक्याचा मनसोक्त आनंद लुटा. बेंगळूरू पासून सुरू होणारा ‘ द गोल्डन चॅरीयट ‘चा प्रवास, तुम्हाला काबिनी, मैसूर, हासन, होस्पेट, गदग आणि गोव्याला नेऊन आणून पुनश्च बेंगळूरू पर्यंत तुम्हाला आणून सोडेल. ह्या प्रवासाच्या आठवणी तुमच्या मनामध्ये कायम राहतील.

या ट्रेन प्रवासातील निरनिराळ्या ठिकाणी अनेक सुन्दर अनुभव तुम्हाला घेता येतील. काबिनी मध्ये तुम्हाला बोट आणि जीप राईड्सचा आनंद घेता येईल, तर मैसूरमध्ये तुम्हाला हत्तीच्या सवारी भ्रमणाचा आणि बर्ड वॉचिंगचा रोचक अनुभव घेता येईल. श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या मूर्ती पुढे नतमस्तक होण्याचे भाग्य तुम्हाला या प्रवासादरम्यान लाभेल. दक्षिण भारताच्या मनोरम्य निसर्गाचे दर्शन घेत हा प्रवास तुम्हाला गोव्याला घेऊन येईल. गोव्यामधील सुंदर समुद्रकिनारे, पोर्तुगीजांच्या काळी बांधली गेलेली भव्य चर्च आणि इतर इमारती, या सर्वांचा आनंद तुम्हाला गोव्याच्या सफरीमध्ये घेता येईल. त्याचबरोबर गोव्याच्या प्रसिद्ध ‘फेणी’ चा आस्वाद देखिल घेता येईल.

द गोल्डन चॅरीयट मधील केबिन्स वातानुकुलित असून, येथे जेवणाची उत्तम सोय आहे. तसेच इथल्या बारमध्ये तुम्हाला अनेक निरनिराळ्या कॉकटेल्सचा आस्वाद देखील घेता येईल. जर या प्रवासादरम्यान तुम्हाला खूपच थकवा आला, आणि रीलॅक्सेशन ची गरज जाणवली, तर या ट्रेनमध्ये आयुर्वेदिक मसाज स्पा ची देखील सोय प्रवाश्यांसाठी केली गेली आहे. ह्या ट्रेनची सफर खऱ्या अर्थाने एक यादगार सफर ठरेल.

Leave a Comment