कीटकनाशके हटविण्यासाठी अशी धुवा फळे आणि भाज्या


फळे किंवा भाज्या नळाच्या पाण्याने कितीही वेळ धुतल्या, तरी त्यावरील कीटकनाशके संपूर्णपणे नघून जात नाहीत. फळांवर किंवा भाज्यांवर फवारली जाणारी कीटकनाशके खराब हवामानामध्ये फळे किंवा भाज्या खराब होऊ नयेत यासाठी पण उपयोगात आणली जातात. त्यामुळे ही रसायने फळांवर किंवा भाज्यांवरून सहजासहजी निघून जात नाहीत. मग रसायने हटवून भाज्या आणि फळे खाता यावीत यासाठी कोणता उपाय करायला हवा, हे पाहूया.

फळे आणि भाज्या वाहत्या नळाच्या पाण्याखाली धुतल्याने त्यांच्यावरील कीटकनाशके संपूर्णपणे निघून जात नसली, तरी काही प्रमाणात हटविली जाऊ शकतात. वाहत्या पाण्याखाली फळे किंवा भाज्या हाताने, किंवा एखाद्या नरम ब्रशने चोळून धुणे आवश्यक आहे. अश्या रीतीने कीटकनाशके काही प्रमाणात भाज्यांवरून उतरून जातात.

आणखी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये पाणी आणि व्हिनेगर एकत्र करावे. तीन भाग पाणी असल्यास एक भाग व्हिनेगर घ्यावे. ह्या मिश्रणामध्ये भाज्या आणि फळे थोडा वेळ बुडवून ठेवावीत. मिठाच्या पाण्यामध्ये भाज्या आणि फळे काही काळ बुडवून ठेवल्याने देखील त्यांच्यावरील कीटक नाशके पुष्कळ प्रमाणात हटविली जातात. मीठ आणि पाण्याच्या मिश्रणाने क्लोरोपायरीफॉस, डीडीटी, सायपरमेथ्रीन, आणि क्लोरोथॅलोनिल हे कीटकनाशके प्रभावीपणे हटविली जाऊ शकतात. व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये फळे आणि भाज्या जास्त काळ ठेवल्या तर त्यांच्यामध्ये व्हिनेगरची चव उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

सफरचंदांसारख्या फळांवर आजकाल, ती चमकदार दिसावीत म्हणून मेण लावण्यात येते. हे मेण आणि इतर कीटकनाशके हटविण्यासाठी फळे पाणी आणि बेकिंग सोडाच्या मिश्रणामध्ये धुवावीत. सुमारे दहा मिनिटे ही फळे या मिश्रणात राहू द्यावीत आणि त्यानंतर नळाच्या पाण्याखाली स्वछ धुवावीत. पाणी आणि लिक्विड ब्लीच मध्ये फळे आणि भाज्या धुण्याचा प्रयोग काहींनी करून पहिला आहे.

फळांवरील किंवा भाज्यांवरील कीटकनाशके हटविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे फळे किंवा भाज्या स्वछ धुवून, साले काढून मगच खावीत. पण जर सर्वच भाज्यांची आणि फळांची साले काढली, तर शरीराला नैसर्गिक फायबर कमी प्रमाणात मिळेल. शिवाय बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण सर्वच फळांसाठी उपयुक्त नाही. स्ट्रॉबेरी सारखी फळे, पाण्यामध्ये भिजवून न ठेवता वाहत्या पाण्याखाली, अगदी खायच्या वेळी धुवावीत. तसेच बटाटे, गाजरे इत्यादी भाज्या धुताना एखाद्या मऊ ब्रशचा वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment