तुमच्या मुलाला ‘ पेडियाट्रिक ओसीडी ‘ आहे का?


‘ऑब्सेसीव्ह कंपल्सिव्ह डीसॉर्डर’ या मनोविकाराला ‘ओसीडी’ या नावाने ओळखले जाते. हा मनोविकार रुग्णाच्या एखाद्या सवयीशी निगडीत असतो. त्या सवयीशी निगडीत कृती रुग्ण सतत करीत राहतो. काही व्यक्तींना स्वच्छतेसंबंधी ओसीडी असते. ह्या व्यक्ती सतत घरामध्ये किंवा जिथे जातील तिथे स्वच्छता करीत राहतात. समोर असणाऱ्या वस्तू सतत पुसून काढणे, धुळीचा कण जरी दिसला तरी अस्वस्थ होणे, सतत झाडत-पुसत राहणे, वस्तू नीटनेटक्या ठेवण्याबद्दल आग्रही असणे, अशी या व्यक्तींची मानसिकता होऊन जाते. वस्तू नीटनेटक्या ठेवण्याची सवय चांगली आहे, पण याबाबतीत ओसीडी असणाऱ्या व्यक्तींना वस्तू जागच्या जरा सुद्धा इकडे-तिकडे झालेल्या चालत नाहीत. एखादी वस्तू एका विशिष्ट प्रकारेच ठेवली गेली पाहिजे याबद्दल ह्या व्यक्ती अतिशय आग्रही असतात. त्यांच्या या आग्रहाचा त्रास त्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना क्वचितप्रसंगी होत असतो.

ओसीडी हा मनोविकार केवळ मोठ्या व्यक्तींमध्ये नाही, तर लहान मुलांमध्ये देखील आढळतो. त्यांच्या या स्वभावविशेषाकडे पालक हट्टीपणा म्हणून दुर्लक्ष तरी करतात, किंवा शिस्तीचा बडगा मुलांना दाखविला जातो. पण जर एखाद्या सवयीबद्दल मुले गरजेपेक्षा अधिक आग्रही वाटली, तर हा ओसीडी असू शकतो. ह्या मनोविकाराची लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ओसीडी असणाऱ्या मुलांची एखादी सवय इतकी त्रासदायक ठरू लागते, की त्या मुलाला त्या सवयीशी निगडीत कृती सतत केल्याशिवाय राहवत नाही. परिणामी अशी मुले आपले आयुष्य सामन्यपणे जगू शकत नाहीत. वारंवार त्याच कृतीचे विचार मुलाच्या मनामध्ये येत राहतात. जर कृती मनासारखी घडली नाही, तर त्याचा परिणाम म्हणून मानसिक अस्वस्थता, चिडचिड, भीती, ह्या भावना मुलांमध्ये पाहायला मिळतात.

मुलांमध्ये ओसीडीशी निगडीत काही कृती वारंवार पहावयास मिळतात. काही मुलांमध्ये, त्यांना कुठल्या तरी जंतूंचा संसर्ग होईल, आणि मग आजार होईल अशी भीती दिसून येते. अशी मुले वारंवार हात-पाय धुतात, आपल्या आसपासच्या वस्तू सतत पुसून काढतात, आपला हात कुठल्याही वस्तूला लागू नये याबद्दल आग्रही असतात. काही मुलांमध्ये सतत काही तरी वाईट घडणार आहे, अशी भीती दिसून येते. अशी मुले वारंवार दारे-खिडक्या बंद करताना दिसतात, किंवा अनोळखी माणसांचा सहवास त्यांना अजिबात आवडत नाही. एखादी वस्तू नीट ठेवण्याकडे काही मुलांचा कल असतो, किंवा एखादे काम करताना जर ते मनासारखे झाले नाही, तर पुन्हा पहिल्यापासून त्या कामाला सुरुवात करण्याबद्दल ही मुले आग्रही असतात. या आणि अश्या अनेक कृती ओसीडीची लक्षणे असू शकतात.

ह्या मनोविकाराचे योग्य निदान होण्यासाठी मुलाच्या पालकांना ओसीडी आणि हट्टीपण यातील फरक ओळखता यायला हवा. एखाद्या गोष्टीसाठी मुले हट्ट करतात, ही अतिशय सामान्य बाब आहे. मुलांना हवी असलेली वस्तू मिळाली, किंवा त्यांची योग्य प्रकारे समजूत काढली, तर बहुतेक मुले आपला हट्ट सोडून देतात. पण ज्या सवयीची ओसीडी आहे, ती कृती मुले वारंवार, खूप वेळ देऊन करतात. मुलांच्या मनामध्ये देखील सतत त्याच सवयीचा विचार सुरु असतो. लहान मुलांमधील ओसीडी ओळखण्यास काहीसा कठीण असतो, पण पालकांनी लक्षणे ओळखून वैद्यकीय सल्ला घेतल्यास, हा मनोविकार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment