तुम्हाला कर्कश्श आवाजाचे भय वाटते का?


तुम्हाला अतिशय तीव्र, कर्कश्श आवाजाची भीती वाटते का? असे असेल, तर तुम्ही ‘अकाऊस्टिकोफोबिया’ नामक फोबियाने, म्हणजेच भीतीने ग्रासलेले असू शकता. ज्यांना हा विकार असेल, त्यांना जास्त मोठ्या आवाजाच्या ठिकाणी खूप त्रास होतो. ‘ अकाऊस्टिक्स ‘ म्हणजे आवाज, आणि त्यांचा फोबिया , म्हणजे मोठ्या आवाजाची एखाद्याच्या मनामध्ये असलेली भीती. एखाद्या ठिकाणी जर खूप गोंगाट असेल, किंवा जोरजोराने आवाज येत असतील, तर हा विकार असणाऱ्या व्यक्ती अतिशय अस्वस्थ होताना आढळतात. अश्या व्यक्ती मोठा आवाज ऐकून घाबरून जातात, त्यांच्या शरीराला कंप सुटतो आणि त्या घामाघूम व्हायला लागतात. क्वचित प्रसंगी हा विकार असणाऱ्या व्यक्तीला मोठ्या आवाजाने मळमळू लागते, श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि तोंडाला कोरड पडते.

ज्या व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली असतात, ज्यांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी सतावत असते, अश्या व्यक्तींमध्ये हा विकार उद्भविण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक फोबिया उद्भविण्यामागे काही न काही कारण असतेच. कुठली तरी विशिष्ट घटना, लहानपणीची एखादी भीतीदायक आठवण, यामागील कारणे असू शकतात. तसेच परिवारातील वातावरण आणि लहानपणापासून त्या व्यक्तीचे झालेले संगोपन कसे होते या वरही व्यक्तीची मानसिक स्थिती अवलंबून असते. एखाद्या दुर्घटनेला सामोरे गेलेले असणे, हे ही या फोबियामागील कारण असू शकते. मोठ्या आवाजामुळे झालेली एखादी दुर्घटना या फोबियामागचे कारण असू शकते.

या फोबियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला अचानक मोठ्या आवाजाने त्रास सुरु झाल्यास, सर्वाप्रथम त्या व्यक्तीला तिथून लांब घेऊन जाणे आवश्यक आहे. नंतर त्या व्यक्तीला धीर देणे महत्वाचे आहे. फोबियासाठी उपचार करण्यासाठी रुग्णाला सर्वप्रथम मानसिक तणाव कमी करणारी औषधे दिली जातात. ही औषधे रुग्णाला काही काळ घ्यावी लागतात. त्यानंतर रुग्णाला ‘ डीसेन्सिटायझेशन ट्रीटमेंट ‘ दिली जाते. या उपचारपद्धतीमध्ये रुग्णाला निरनिराळ्या तीव्रतेचे आवाज ऐकण्याची सवय लावली जाते. रुग्णाच्या मनातून मोठ्या, तीव्र आवाजाचे भय काढून टाकण्यासाठी ही उपचारपद्धती वापरली जाते. तसेच रुग्णाला बिहेव्हियरल सायकोथेरपी सुद्धा दिली जाते. यामध्ये मोठ्या आवाजाची भीती उत्पन्न होण्यामागे नक्की काय कारण असू शकेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न डॉक्टर्स करतात. हे कारण जाणून घेतल्यानंतर रुग्णाच्या मनातून आवाजाची भीती काढून टाकण्याचे प्रयत्न डॉक्टर्स करतात.