या पठ्ठ्याचे तोंडपाठ आहेत २० कोटीपर्यंतचे पाढे


लहान मुलांसाठी पाढे म्हणणे म्हणजे एकप्रकारे शिक्षाच असते. मुलांना शाळेत शिक्षक आणि घरी आईवडिल ओरडल्यामुळे कसेबसे १० पर्यंतचे पाढे येतात. पण त्यापुढचे पाढे अनेकांना काही केल्या पाठ होत नाहीत आणि मग त्यांचे गणित आयुष्यभर कच्चेच राहते. पण याला अपवाद ठरला आहे उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथे राहणारा एका आठवीतला मुलगा. या मुलाला एक, दोन नाही तर तब्बल २० कोटींपर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. चिराग नरेंद्र सिंह असे या मुलाचे नाव असून सध्या तो आठवी इयत्तेमध्ये शिकत आहे.

आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत चिरागने आपली चुणूक दाखवून दिली आहे. मोठेपणी आपल्याला शास्त्रज्ञ व्हायचे असून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करायचे चिरागचे स्वप्न आहे. त्याचप्रमाणे आपली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले. आमची आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसली तरीही चिरागकडे जन्मत: असलेली बुद्धीमत्ता वाया जाणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेऊ असे त्याच्या वडिलांनी सांगितले.