सणासुदीच्या काळात लोअर बर्थ हवी तर भरा जास्त पैसे


नवी दिल्ली – लांबच्या पल्ल्याचा रेल्वे प्रवास करताना स्लीपर कोचमध्ये लोअर, मिडल आणि अप्पर असे तीन बर्थ असतात. तुम्हाला यामध्ये आरक्षण करताना लोअर बर्थचा पर्याय उपलब्ध असतो. पण आता लोअर बर्थ तुम्हाला सणासुदीच्या काळात हवा असले तर जास्त पैसे भरावे लागणार आहेत. हा नवा नियम रेल्वे प्रशासनाने लागू केला असून सणासुदीच्या काळात यामुळे रेल्वेने प्रवास करणे महागात पडणार आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांना रेल्वे हा सर्वच अर्थाने प्रवासाचा उत्तम उपाय असल्याने त्यालाच अनेकांची पसंती असल्याचे दिसते. सणावाराला आपल्या घरी शिक्षण किंवा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात गेलेल्यांना जायचे असल्याने रेल्वेस्टेशनवर नागरिकांची झुंबड उडते. अनेक जण प्रवासाला ऐनवेळी गडबड होऊ नये म्हणून आधीपासूनच रेल्वेचे बुकींग करतात. लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया किंवा लहान मुले आणि दिव्यांग व्यक्ती यांना असल्यास त्यांचा प्रवास जास्त सुखकर होऊ शकतो. पण तुम्हाला आता लोअर बर्थ हवा असले तर जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. याबाबतचा अहवाल रेल्वेच्या भाडेदरासंबंधात सर्वेक्षण करण्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या समितीने दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमानातून प्रवास करताना ज्याप्रमाणे पुढच्या सीटसाठी प्रवासी जास्त रक्कम मोजतात त्याचप्रमाणे आता रेल्वेच्या लोअर बर्थसाठीही जास्तीची रक्कम देऊ शकतात.

Leave a Comment