या गोष्टी करण्यापासून मुलांना रोखू नका


काही गोष्टी आणि त्यांच्या आठवणी, आणि आपले बालपण यांची सांगड कशी घट्ट असते ! मातीमध्ये खेळणे, आईची नजर चुकवून गावभर, मित्र-मैत्रिणींच्या संगतीत हिंडणे.. अश्या वेळी डोक्यावरच्या उन्हाची पर्वा न करता लपंडाव, डब्बा ऐसपैसचे रंगणारे डाव..याच्या आठवणी मनातून पुसल्या जात नाहीत. त्या काळी मुलांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमालीची असे. पावसात भिजून किंवा थंडगार बर्फाचा गोळा खाऊन, मातीत खेळून मुले सहजासहजी आजारी पडत नसत. आता काळ बदलला, तशी मुलांना वाढविण्याच्या तऱ्हा देखील बदलल्या. मुलांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून मोठे व्हायला हवे असे म्हणणारे आधीचे आई बाबा, आता मुले थोडीशी कळती होता क्षणीच त्यांची मैत्री टीव्ही आणि व्हिडियो गेम्सशी करून देतात. जोडीला मोबाईल फोनही असतोच. पण अश्या वेळी मुलांनी काही गोष्टींचा आनंद घ्यायलाच हवा. त्या गोष्टींपासून त्यांना वंचित न ठेवता, त्या गोष्टी त्यांना मनसोक्त करू द्याव्यात.

मुले आजारी पडतील का, याची फार काळजी न करता, पावसाच्या पाण्यामध्ये मुलांना मनसोक्त खेळू द्या. चिखलामध्ये हात घालू द्या, या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो. पाळीव प्राण्यांशी खेळणे मुलांकरिता, त्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी अतिशय फायद्याचे आहे. मानसिक तणाव फक्त घरातील मोठ्यांनाच असतात असे नाही. लहान मुलांच्या मनावरही अनेक गोष्टींचे तणाव असतात. पाळीव प्राण्यांचा लळा असणे, त्यांच्या मनावरील तणाव कमी करणारे आहे. याचबरोबर प्राण्यांबद्दल लहान मुलांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची असते.

लहान मुलांच्या मनामध्ये अनेक वेळा चित्र विचित्र गोष्टी पाहून कुतूहल निर्माण होते. त्यावेळी मुलांना त्या वस्तूंबद्दल सांगावे, त्या वस्तूंना स्पर्श करू द्यावा. जर त्यांनी पाहिलेली, स्पर्शिलेली वस्तू आणि तो अनुभव, त्यातून मिळालेला आनंद मुलांच्या कायम स्मरणात राहील. कधी तरी मुलांना घरामध्ये पसारा घालू द्यावा. त्यांच्या मनामध्ये येतील ती खेळणी त्यांना काढू द्यावी, त्यांच्याबरोबर पालकांनी देखील खेळामध्ये सहभागी व्हावे. एखाद्या कलेची किंवा खेळाची मुलांना आवड असेल, तर ती कला आत्मसात करण्यासाठी, किंवा तो खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे.