भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश राज यांच्या सभेनंतर स्टेजवर शिंपडले गोमूत्र


नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या सदस्यांनी अभिनेता प्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर संपूर्ण मंचावर गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार समोर आला आहे. कन्नड वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचे कात्रण ट्विट करत याबद्दलची माहिती प्रकाश राज यांनी दिली.

प्रकाश म्हणाले की, त्यांचा कर्नाटकमधील राघवेंद्र मठात एक कार्यक्रम होता. प्रकाश यांनी या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्याविरोधात टीका केली. भाजप युवा मोर्चाच्या सदस्यांना ही टीका फारशी आवडली नाही. युवा मोर्चाच्या सदस्यांनी गोमूत्राने मकरसंक्रांतीच्या दिवशी कार्यक्रम स्थळाची साफसफाई केली. या प्रकारानंतर प्रकाश यांनी ‘मी जिथे जिथे जाईन तिथे भाजपचे लोक अशाच पद्धतीने गोमूत्राने जागा साफ करणार का? असा प्रश्न विचारला आहे.