‘बिग बॉस’च्या मराठी आवृत्तीचे सूत्रसंचलन करणार रितेश ?


मुंबई : आता मराठीत हिंदी टेलिव्हिजन विश्वात खळबळ माजवणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ येणार असून सलमान खानने याची अधिकृत घोषणा बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये केली. शोची सूत्रे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या हाती दिली जाण्याची शक्यता आहे.

‘बिग बॉस ११’चे विजेतेपद अभिनेत्री शिल्पा शिंदेने पटकावले. शिल्पाने हे जेतेपद हीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देत मिळवले. येत्या दोन महिन्यात ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोणावळ्यात बिग बॉसचा सेट तयार असल्यामुळे तिथेच शूटिंग होण्याची शक्यता आहे.

‘लय भारी’ या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवल्यानंतर ‘विकता का उत्तर’ या टीव्ही शोचे सूत्रसंचालनही त्याने केल्यामुळे बिग बॉस मराठीचा होस्ट म्हणून रितेशला पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरेल. बिग बॉस आणि वाद हे जणू समीकरणच असल्यामुळे हा शो मराठीत आल्यावर कोणकोणते कलाकार यामध्ये सहभागी होणार, त्यांच्यातही टोकाचे वाद रंगणार का, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.