ओडिशाच्या ‘मांझी’ने मुलांच्या शिक्षणासाठी डोंगर फोडून बनवला रस्ता


कंधमाळ – आपण सर्वांनी दशरथ मांझीने गावकऱ्यांना दळणवळण सोयीचे व्हावे याकरता छन्नी हातोड्याने डोंगर फोडून रस्ता बनविला हे ऐकलेच आहे. आता त्याच्याप्रमाणेच ओडिशामधील एका अवलियाच्या कर्तबगारीची अचाट कहाणी समोर आली आहे. कंधमाळ जिल्ह्यातील जालंधर नायक याने शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांना सोयीचे व्हावे याकरिता तब्बल ८ किमी लांबीचा रस्ता तयार केला आहे.

जालंधर नायक कंधमाळ जिल्ह्यातील गुमशाही या दुर्गम भागात आपल्या परिवारासह राहतात. तेथे पूर्वी राहणारे लोक दळणवळण आणि अन्य सोयीसुविधांच्या अभावामुळे अन्य भागांत विस्थापित झाले. पण नायक यांनी आपला पत्ता बदलला नाही. त्यांच्या मनात कायम शिक्षणाच्या सुविधा न मिळाल्याची खंत होती. नायक यांनी त्यामुळे आपल्या मुलांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचविण्याचा निश्चय केला. याकरिता अडथळा ठरत होती शाळेला जाण्यासाठी असणारी वाट. डोंगराळ, आडवळणाच्या वाटेवरुन त्यांना मार्ग काढावा लागत असे. तो रस्ता बनविण्याचा नायक यांनी निर्धार केला.

नायक गेल्या २ वर्षांपासून दररोज ८ तास आपल्या गावाचा रस्ता मुख्य मार्गाला जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तब्बल ८ किमी लांबीचा रस्ता एकट्याने तयार केला आहे. त्यामुळे गुमशाही या दुर्गम गावातून फुलबानी गावांपर्यत पोहोचणे सुकर ठरले आहे. दरम्यान, स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नायक यांना पूर्ण मदतीची तयारी दर्शविली आहे. शहराच्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन देण्याचे म्हटले आहे. मात्र, नायक आपल्या गावीच राहण्यावर ठाम आहेत.

Leave a Comment