नव्या नोकरीसाठी वेतन नेगोशियेट करताना…


एखाद्या नोकरीसाठी मुलाखत दिल्यानंतर जर त्या नोकरीसाठी तुमची निवड झाली, तर मग या नव्या नोकरीसाठी तुम्हाला मिळणार असलेल्या वेतनाची निश्चिती केली जाते. या प्रसंगी तुमच्या काय अपेक्षा आहेत हा प्रश्न विचारला जातो. अश्या वेळी आपल्याला मिळणार असलेले वेतन निश्चित करण्यासाठी नेगोसियेशन, म्हणजेच वाटाघाटी कराव्या लागतात. त्यावेळी बोलताना जर विचारपूर्वक बोलणी केली नाहीत, तर सर्वच मामला फिसकटण्याचा संभव असतो. त्यामुळे नेगोसियेशन करताना काही गोष्टींचा उल्लेख करणे टाळावे.

आपण घर बदलणार आहे, किंवा घरामध्ये काही अडचण आहे, अस सांगत वेतनासाठी नेगोसियेशन करण्याचे आवर्जून टाळावे. तुमच्या घरातील अडचणी हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याचा उल्लेख मुलाखतीमध्ये करणे टाळावे. आपण आपल्या अडचणी मांडल्याने इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्ती आपल्या जास्त वेतन मंजूर करतील असे वाटून आपल्या अडचणी मांडत बसू नये. त्या ऐवजी नोकरीमधील तुमच्या प्रोफाईल बद्दल चर्चा करा. तुमची पात्रता सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. या नोकरीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी किंवा समस्या सोडविण्याची क्षमता तुमच्या मध्ये आहे, हे तुमच्या बोलण्यावरून दाखवून द्या.

आपल्याला पगारवाढीची आवश्यकता आहे, ही वारंवार बोलून दाखविणे टाळावे. आपल्याला नोकरी करीत असताना उत्तम वेतन मिळावे अशी इच्छा सर्वांचीच असते. पण पगारवाढीची किंवा आपल्याला अपेक्षित वेतनाची आपल्याला ‘गरज’ आहे असे म्हणण्यापेक्षा पगारवाढ किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला वेतन दिले जावे आणि त्याकरिता तुम्ही ‘ योग्य’ आहात, हे पटवून देणे जास्त महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे वेतन निश्चिती साठी बोलणी करताना, आपल्याला दुसऱ्या कंपनीकडून या पेक्षा अधिक वेतनाची ‘ऑफर ‘ आहे. या गोष्टीचा उल्लेख करू नये.

आपल्या अपेक्षेप्रमाणे वेतन मिळावे यासाठी नेगोसियेशन करताना आपल्याला या पूर्वी आपण काम करीत असलेल्या कंपनीमध्ये कधीच मनासारखा ‘ हाईक ‘ किंवा वेतनवाढ मिळाली नाही, म्हणून वेतनवाढ व्हावी असे म्हणणे टाळावे. त्याचप्रमाणे त्या कंपनी मध्ये काम करणाऱ्यांना जास्त वेतन मिळते आहे, तेव्हा आपल्याला ही जास्त वेतन मिळाले पाहिजे असा उल्लेखही आवर्जून टाळावा. वेतनासाठी वाटाघाटी करताना आपला कामासंबंधीचा पूर्वानुभव, आपल्याला मिळालेले यश, दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडण्याची आपली तयारी आणि तशी पात्रता, आपण काम अधिक चांगल्या प्रकारे कसे करू शकतो या साठी काही नवीन कल्पना, यांबद्दल चर्चा करावी.