अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अन्न पॅक करणे योग्य आहे का?


मुलांच्या शाळेचा किंवा ऑफिसमध्ये नेण्याचा डबा पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर घराघरात केला जातो. जेवण पॅक करण्यासोबतच ओव्हनमध्ये भाज्या, चिकन ग्रिल करण्यासाठी देखील अॅल्युमिनियम फॉईलचा वापर होत असतो. हॉटेल मधु जेवण पॅक करून आणताना देखील फॉईल कंटेनर मधेच दिले जाते. पण अॅल्युमिनियम फॉईल मध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्नामधील पोषक तत्वे नष्ट तर होतातच, शिवाय अन्न लवकर खराबही होते. अॅल्युमिनीयम फॉईल मध्ये ठेवलेले अन्न वारंवार गरम करणे देखील शरीराला धोकादायक ठरू शकते. जर अन्नपदार्थ मसालेदार असेल, तर त्या अन्नपदार्थावर या फॉईलचे दुष्परिणाम अधिक लवकर दिसून येतात. त्यामुळे अन्नपदार्थ शिजविण्यासाठी किंवा पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर शक्यतो टाळावा.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या रिपोर्ट नुसार अॅल्युमिनीयम फॉईल मध्ये शिजविलेले अन्न फॉईलमधील अॅल्युमिनियम शोषून घेत असते. विशेषतः अन्नपदार्थ मसालेदार, तेलकट असेल, तर हे प्रमाण आणखी जास्त असते. अल्झायमर हा मनोविकार असलेल्या रुग्णाच्या ब्रेन टीश्यू मध्ये अॅल्युमिनीयम फार जास्त प्रमाणात आढळल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जर शरीरामध्ये प्रमाणाबाहेर अॅल्युमिनियम जात असेल, तर मेंदूची वाढ खुंटू शकते, आणि सांधेदुखी सारखे विकार बळावू शकतात, असे ही काही रिसर्च मध्ये स्पष्ट झाले आहे.

अॅल्युमिनीयमचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, फॉईलचा वापर कमीत कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे. अन्न मायक्रोवेव्ह मध्ये गरम करण्यासाठी काचेच्या भांड्यांचा वापर केला जाणे आवश्यक आहे. तसेच अन्नपदार्थ ग्रिल करण्यासाठी बेकिंग शीट चा वापर करावा. अॅल्युमिनियम फॉईल मध्ये अन्न पॅक करायचेच असेल, तर अन्न थंड झाल्यानंतर मग फॉईल मध्ये पॅक करावे. हे पॅक केलेले अन्न जास्त वेळ फॉईल मध्ये राहू देऊ नये.