एटीएमही गारठली- रूम हिटरची सोय केली


सध्या थंडीचा मोसम आहे आणि उत्तरेकडील राज्ये थंडीने चांगलीच गारठली आहेत. केवळ माणसे आणि जीवजंतूच नाही तर बँकेची एटीएम मशीन्स ही या थंडीने गारठली असल्याचे समजते. हिमाचलच्या लाहोल स्पिती भागात पारा शून्याखाली गेला आहे व त्यामुळे येथील स्टेट बँकेने एटीएम व्यवस्थित कार्यरत राहावीत यासाठी एटीएमना उबदार पांघरूणे घातली आहेतच पण एटीएम खोल्यातून रूम हिटरही सुरू केले आहेत. थंडीमुळे एटीएम वारंवार जाम होत असल्याने ही उपाययोजना केली गेली आहे.

बँक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार थंडीमुळे एटीएम जॅम होत आहेत. दिवसभर ती सुरळीत सुरू राहावीत यासाठी रूम हिटर लावणे भाग पडते आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एटीएम रूममध्ये लाकूड अथवा कोळसे पेटवून उष्णता निर्माण करणे शक्य नाही त्यामुळे वीजेवरच अवलंबून राहणे भाग पडते आहे. वीज नसेल तर सर्व व्यवहार ठप्प होत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी एटीएम सुरू असणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन वरीलप्रमाणे व्यवस्था केली जात आहे.