यवतमाळमध्ये पार पडला समलैंगिक विवाह


यवतमाळ – यवतमाळमधील एका पुस्तक विक्रेत्याच्या मुलाने चीनमधील तरुणाशी येथील एका अलिशान हॉटेलमध्ये लग्न केले. हा विवाह सोहळा मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला असून विवाह सोहळ्याविषयी गोपनीयता बाळगण्यात आली होती.

यवतमाळमधील या प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचा मुलगा अमेरिकेत नोकरी करतो. त्याला अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी असून सध्या त्याच्यासोबत त्याचे आई-वडिलही अमेरिकेतच असतात, अशी माहिती आहे. चीनमधील एका तरुणाशी अमेरिकेत त्या तरुणाची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. पण दोन्ही तरुणांच्या घरातील मंडळी समलैंगिक विवाहाला तयार होतील का? हा प्रश्नच होता. या लग्नाला मुलाच्या आईचा विरोध होता. पण कुटुंबातील मंडळी मुलाच्या आग्रहाखातर या लग्नासाठी तयार झाली.

लग्न यवतमाळमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हे वऱ्हाड अमेरिकेतून थेट यवतमाळमध्ये आले. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत यवतमाळमधील एका अलिशान हॉटेलमध्ये हा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. मात्र, लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि यवतमाळमध्ये या विवाह सोहळ्याची चर्चा सुरु झाली.

Web Title: Yavatmal is the first gay marriage in the state