मुंबईत नौदलाला एक इंचही जागा देणार नाही – नितीन गडकरी


मुंबई – घरांसाठी दक्षिण मुंबईमधील भूखंड मागण्यासाठी नौदलाचे अधिकारी काही महिन्यांपूर्वी आले होते. मुंबईतच त्यांना घर कशासाठी हवे? सीमेवर त्यांची खरी गरज असल्यामुळे मुंबईत नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या घरासाठी एक इंचही जागा देणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत नौदल अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नौदल अथवा संरक्षण मंत्रालय म्हणजे सरकार नव्हे, तर केंद्रामध्ये सरकार आहे आणि त्यात आम्ही आहोत, असेही त्यांनी खडसावले. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंदिरा डॉकमध्ये प्रस्तावित मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे भूमिपूजन करण्यात आले. नौदलाचे कमांडंट चीफ व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीष लुथ्रा या वेळी उपस्थित होते.

दक्षिण मुंबईमधील मलबार हिल येथे जलपर्यटनाला चालना देण्यासाठी तरंगता धक्का (जेट्टी) उभारण्याचा प्रस्ताव होता. पण त्याला नौदलाने परवानगी नाकारली. नितीन गडकरी त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मलबार हिल परिसरात आहे. तसेच हा खासगी निवासी परिसर आहे. असे असताना येथे तरंगता धक्का उभारण्यास नौदलाने हरकत घेण्याचे कारण काय? नौदलाचे या परिसरात ना अस्तित्व आहे ना नौदलाचा कोणता कारभार त्या भागात आहे. नौदलाने तरंगत्या धक्क्याला न्यायालयाने परवानगी दिलेली असतानाही स्थगिती दिली असल्याचे कानावर आले असल्यामुळे नौदलाने तरंगत्या धक्क्याला विरोध करण्याऐवजी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

Web Title: Will not give the Navy an inch of space in Mumbai - Nitin Gadkari