यावर्षी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार या नायक-नायिकांच्या जोड्या


राज कपूर–नर्गिस, अमिताभ-रेखा, शाहरुख-काजोल या जोड्या बॉलीवूडच्या सदाबहार जोड्या आहेत. या जोड्यांनी एकमेकांसोबत केलेले सर्वच चित्रपट प्रेक्षकांना पसंत पडले. पण आता बदलत्या चित्रपटांच्या कथानाकांबरोबरच प्रेक्षकांची पसंती देखील बदलली आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये नवे चेहरे आणि नव्या जोड्या पाहणे जास्त आवडू लागले आहे. नवे नायक नायिका आणि त्यांच्यामधील ‘केमिस्ट्री‘ हा सर्वांच्याच चर्चेचा विषय असतो.

२०१८ साली प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्येही प्रेक्षकवर्गाला नव्या जोड्या पाहायला मिळणार आहेत. आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असलेल्या बहुचर्चित ‘ पद्मावत ‘ या चित्रपटामध्ये शाहीद कपूर आणि दीपिकाची जोडी प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

यशराज फिल्म्स बनवीत असलेल्या ‘ सुई धागा- मेन ईन इंडिया ‘ या चित्रपटामध्ये वरूण धवन आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. तसेच ‘ पद्मावत ‘ मध्ये अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारल्यानंतर रणवीर सिंह आता क्रिकेटवीर बनण्याच्या तयारीत आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट १९८३ सालच्या भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणवीर आणि कटरिना कैफची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

अक्षय कुमार अभिनीत ‘ गोल्ड ‘ या चित्रपटामध्ये टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री मौनी रॉय अक्षय सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर बाहुबली फेम प्रभास ‘ साहो’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘ गली बॉय ‘ या चित्रपटामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची जोडी पाहायला मिळणार आहे. तर दिग्दर्शक अतुल मांजरेकर यांच्या ‘ फन्ने खान ‘ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय आणि राजकुमार राव या दोन मातब्बर कलाकारांची जोडी पाहायला मिळणार आहे.

नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असलेल्या ‘ ड्राईव्ह ‘ या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलीन फर्नांडीस यांची जोडी प्रेक्षकांना प्रथमच पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट आणि विक्की कौशल ह्यांची जोडी मेघना गुलजार दिग्दर्शित ‘ राजी ‘ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर वरूण धवन आणि बनिता संधू यांची जोडी ‘ अक्तूबर ‘ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. बनिता संधू हिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. सध्या चर्चेत असलेला ‘ पॅड मॅन ‘ या चित्रपटामध्ये अक्षय आणि राधिका आपटे यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: This year, these couple will see make romance on the big screen