फिटनेसचा नवा ट्रेंड – अॅक्वा अॅरोबिक्स


आताच्या काळामध्ये शरीर सुडौल बनविण्याकरिता अॅक्वा अॅरोबिक्स खूपच लोकप्रिय होत आहे. ज्यांना पोहण्याची किंवा पाण्यामध्ये नुसतेच डुंबण्याची आवड आहे, अश्यांकरिता हा व्यायामप्रकार एक चांगला पर्याय ठरू शकतो. जिममध्ये ट्रेडमिल वर धावणे, किंवा स्टेशनरी बाईक चालविणे हे पर्याय ज्यांना कंटाळवाणे वाटू लागले आहेत, त्यांच्यासाठी देखील अॅक्वा अॅरोबिक्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

हा व्यायामप्रकार काहीसा कठीण असला, तरी मनोरंजक नक्कीच आहे. यामध्ये छातीपर्यंत खोल पाण्यामध्ये हातापायांच्या हालचालींमध्ये समन्वय राखत व्यायाम करायचा असतो. या व्यायामप्रकारामध्ये अनेक फ्लोटिंग उपकरणे वापरली जातात. यामध्ये पॅडल्स, किकबोर्ड्स इत्यादी उपकरणे वापरली जातात. ह्या व्यायाम प्रकारामुळे स्नायूंचे उत्तम टोनिंग होतेच, शिवाय ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांच्यासाठी देखील हा व्यायामप्रकार चांगला आहे.

वयस्क व्यक्तींसाठी देखील हा व्यायामप्रकार उत्तम आहे. विशेषतः ज्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारखे त्रास आहेत, त्यांच्यासाठी हा व्यायामप्रकार उत्तम आहे. या व्यायामामध्ये, धावणे, किंवा सायकलिंग इत्यादी व्यायामांमुळे येतो तश्या प्रकारचा कोणताही ताण स्नायूंवर येत नाही. पण पाण्याची घनता जास्त असल्याने पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, परिणामी जास्त कॅलरीज खर्च होतात. तसेच गुडघ्यांना झटके लागणे ही या व्यायामामुळे टाळता येते.

अॅक्वा अॅरोबिक्समुळे स्नायूंबरोबर फुफ्फुसे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. या व्यायामाने शरीर अधिक लवचिक बनते. या व्यायाम प्रकारामध्ये डान्स स्टेप्स असल्याने हा व्यायाम अधिक रंजक आहे. या व्यायामप्रकारामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून पाचन शक्ती सुधारते. हा व्यायामप्रकार वयस्क व्यक्ती, गर्भवती महिला, यांच्यासाठी विशेष फायद्याचा आहे. मात्र हा व्यायाम सुरु करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.