अमेरिकेत पहिल्यांदाच एखाद्या भारतीयाला दिला जाणार मृत्युदंड


वॉशिंग्टन – भारतीय महिला आणि तिच्या नातीची हत्या करण्याप्रकरणी ३२ वर्षीय रघुनंदन यंदमुरीला दोषी ठरविण्यात आले असून २०१४मध्ये रघुनंदनला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता पहिल्या भारतीय अमेरिकन कैद्याच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित करण्यात आली.

६१ वर्षीय भारतीय महिला आणि तिच्या १० महिन्यांच्या नातीचे अपहरण करून त्याने हत्या केली होती. खंडणीसाठी केलेले अपहरण या प्रकरणाला ठरविण्यात आले. २३ फेब्रुवारी रोजी रघुनंदनला मृत्युदंड दिला जाणार आहे. पण २०१५ पासून पेन्सिल्वेनियाचे गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी मृत्युदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली असल्याने त्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेला रघुनंदन हा पहिला भारतीय-अमेरिकन आहे. आंध्रप्रदेशचा रहिवासी असणारा रघुनंदन एच-१बी व्हिसावर अमेरिकेत दाखल झाला होता. त्याने इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली आहे. पेन्सिल्वेनियामध्ये मागील २० वर्षांच्या कालावधीत कोणत्याही दोषीला मृत्युंदडाची शिक्षा देण्यात आलेली नाही.