व्यायाम करताना विश्रांती देखील महत्वाची


वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण सर्वच जण घेत असतो. दररोज व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते हे जरी खरे असले, तरी शरीराला नियमित विश्रांतीची देखील गरज असते हे लक्षात घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. शरीराला अजिबात विश्रांती न देता सतत व्यायाम केल्याने शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच व्यायामाच्या आठवड्याच्या वेळापत्रकामध्ये ‘रेस्ट डे’, म्हणजेच विश्रांतीसाठी राखून ठेवलेले दिवसही महत्वाचे असतात.

जेव्हा व्यायामाच्या रुटीन मधून शरीराला विश्रांती मिळत नाही, तेव्हा शरीरामधील ग्लायकोजेन ची पातळी कमी होऊ लागते. ग्लायकोजेन हे शरीरामध्ये असलेले उर्जेचे भांडार आहे. आपल्या शरीराला आवश्यक ती ताकद ग्लायकोजेन मधूनच मिळत असते. जर शरीरामध्ये ग्लायकोजेन ची पातळी कमी झाली तर व्यायाम करीत असताना स्नायू लवकर शिणून जातात. शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळाली तर शरीरामध्ये ग्लायकोजेनची पातळी चांगली राहते. त्यामुळे व्यायाम करीत असताना स्टॅमिना देखील चांगला राहतो.

सतत व्यायाम करण्याने रेस्टिंग हार्ट रेट, म्हणजेच हृदयावर कोणत्याही प्रकारचा ताण नसतानाची हृदयाच्या ठोक्यांची गती आणि सबमॅक्सिमल एक्सरसाईज हार्ट रेट, म्हणजेच व्यायाम करीत असतानाची हृदयाच्या ठोक्यांची गती, हे दोन्ही सतत वाढलेले असतात. त्यामुळे शरीराला विश्रांती देणे महत्वाचे आहे, जेणेकरून हृदयाच्या ठोक्यांची गती सामान्य होईल.

व्यायामाकरीत असताना स्नायूंवर सतत ताण येत असतो. व्यायामानंतर घेतलेल्या विश्रांतीमुळे स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. पण जर स्नायूंना आवश्यक ती विश्रांती मिळाली नाही, तर शरीरातील ‘मसल मास’ कमी होऊ लागतो, म्हणजेच स्नायू शिथिल होऊ लागतात. त्यामुळे कितीही व्यायाम केला तरी मनासारखे परिणाम दिसून येत नाहीत. तसेच सततच्या व्यायामाने स्नायूंमध्ये लहान लहान ‘ tears ‘ होत असतात. जर शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळाली नाही, तर स्नायूंवर ताण पडून त्यांवर सूज येऊ शकते.

जर शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळत नसेल, तर त्याचा ताण मनावरही येऊ लागतो. त्यामुळे सतत लहान लहान गोष्टींमुळे चिडचिड होऊ लागते, कामांमध्ये लक्ष लागत नाही, परिणामी आत्मविश्वास कमी होऊ लागतो. तसेच काम करताना जास्त वेळ एकाग्रता टिकून रहात नाही, व मेंदू लवकर शिणून जातो. महिलांच्या बाबतीत सतत व्यायामामुळे मासिक धर्माचे चक्र गडबडू शकते. यामध्ये मासिक पाळी अनियमित होणे, शरीरातील एस्ट्रोजेन ची पातळी कमी झाल्याने हाडांची झीज होणे असल्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे व्यायामाच्या मध्ये शरीराला आणि मनाला संपूर्ण विश्रांती देणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही