आता ब्लॉगच्या माध्यमातून भाष्य करणार सुप्रिया सुळे


मुंबई – आता लवकरच ब्लॉगरच्या भूमिकेतही उत्तम संसदपटू असा नावलौकिक मिळवलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दिसणार असून लवकरच त्यांचा राज्यातील किंवा राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि इतर क्षेत्रांतील चालू घडामोडींवर भाष्य करणारा एक ब्लॉग सुरू होणार असून त्या सोशल मीडियात त्या माध्यमातून अधिक सक्रिय होणार आहेत. त्यांचा पहिला ब्लॉग येत्या मकरसंक्रांतीचे औचित्य साधत प्रकाशित होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी आणि खंबीर राजकीय भूमिका यामुळे चांगल्याच लोकप्रिय आहेत. सुप्रिया सुळे या लोकसभेत निव्वळ हजेरी न लावता प्रत्येक महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होत असतात. त्या युवा खासदारांमध्ये तर लोकप्रिय आहेतच, पण त्यांच्या मतांची राजकीय समीक्षकही गंभीरतेने दखल घेत असतात. पण सामान्य जनतेपर्यंत लोकसभेतील चर्चांमध्ये मांडलेली एखादी भूमिका तितक्याच प्रभावीपणे पोहोचत नाही. त्यांनी हा ब्लॉग लिहिण्याचा निर्णय आपली भूमिका प्रभावीपणे आणि थेट लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी घेतल्याचे समजते. त्या फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सध्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत.

त्या आता ब्लॉगद्वारे कशा प्रकारे व्यक्त होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शरद पवार, सुशील कुमार शिंदे, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आदी नेत्यांनी यापूर्वी वर्तमानपत्रांमधून विपुल लेखन केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर पी. चिदंबरम, उपराष्ट्रपतिपदी निवड होण्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांनीदेखील वर्तमानपत्रांतून विपुल लेखन केले आहे.