नवी दिल्ली – देशभरात खादीच्या विक्रीत गेल्या तीन वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली असून देशातील मॉलमध्ये हे कपडे आता उपलब्ध करत विक्री वाढविण्याचा खादी आणि ग्रामीण उद्योग आयोगाचा प्रयत्न आहे. आयोग यासाठी नवीन रणनीतिवर काम करत असून खादीची देशातील २०० प्रमुख मॉलमध्ये विक्री करण्यात येणार आहे.
आता मॉलमध्येही उपलब्ध होणार खादी उत्पादने
पहिल्या ‘खादी कॉर्नर’चे अनावरण नोएडा येथील ग्रेट इंडिया प्लेस मॉलमध्ये करण्यात आले. अपना बझार, शॉपर्स स्टॉप, बिग बझार, लेकवूड मॉल्स, आदित्य बिर्ला फॅशन यासारख्या प्रमुख मॉलबरोबर आता भागीदारी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मुंबईतील कॉटन बझारबरोबर भागीदारी करण्यात आली असून खादी कॉर्नरला फेब्रुवारीमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे. चेन्नई, वाराणसी, अहमदाबाद येथील प्रमुख ब्रॅन्डबरोबर आयोग चर्चा करत आहे. प्रतिदिनी ३० हजार रुपयांची एका खादी कॉर्नरमधून विक्री करण्याचे सध्याचे लक्ष्य आहे. मॉलमध्ये कपडय़ांची विक्री करण्यात आल्याने व्यवसायात वाढ होण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांची पसंती पाहता नवीन डिझाईनमध्ये कपडे दाखल करण्यात येत आहेत, असे आयोगाचे प्रमुख विनय कुमार सक्सेना यांनी म्हटले.