Skip links

सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांचा लेटर बॉम्ब


नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयातील प्रशासनाच्या कामकाजात अनियमतता होती. सरन्यायाधीशांनाही आम्ही यासंदर्भात पत्र लिहीले होते. पण आमच्यासमोर आता नाईलाज असल्याचा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन अशा स्वरुपाचे आरोप केले आहेत.

शुक्रवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषद घेतली. न्या. चेलमेश्वर म्हणाले, ही एक असामान्य घटना असून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता असून न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात आम्ही सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवले, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला दोन महिन्यांच्या घटनाक्रमानंतर माध्यमांसमोर येणे गरजेचे होते. जनतेनेच आता योग्य काय ते ठरवावे, असे त्यांनी सांगितले. लोकशाही न्यायव्यवस्था टिकली तरच टिकेल, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे चेलमेश्वर हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनीच आरोप केल्याने देशभरात खळबळ उडाली. त्यांना यावेळी प्रशासनाच्या कामकाजात अनियमितता म्हणजे नेमके काय?, तुमची मागणी काय होती?, असे प्रश्न विचारण्यात आले. पण याबाबत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. थोड्याच वेळात सरन्यायाधीशांना दिलेले पत्र आम्ही सार्वजनिक करु, असे त्यांनी सांगितले. अद्याप या पत्राची प्रत मिळालेली नाही. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणाशी काही संबंध आहे का असा प्रश्न विचारला असता न्या. लोकूर यांनी त्यावर ‘हो’ असे उत्तर दिले. पण यावर त्यांनी देखील याबाबत सविस्तर भाष्य केलेले नाही.

Web Title: Letter bomb of Supreme Court four judges