नानाच्या ‘आपला मानूस’चा टीझर लाँच


नुकताच बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगनची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘आपला मानूस’चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते नाना पाटेकर आहेत.

क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती नागरगोजे ही व्यक्तिरेखा नाना पाटेकर साकारत आहेत. या टीझरमध्ये आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही यासारखी टाळ्या मिळवणारी वाक्य आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ‘आपला मानूस’चा पहिला लूक अजय देवगनने शेअर केला होता. एका पावसाळी रात्री नाना पाटेकर बाईक चालवताना पोस्टरमध्ये दिसत होते. या पोस्टरवर हा सैतान बाटलीत मावनार नाय अशी टॅगलाईन दिली गेली होती. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

सतीश राजवाडेच्या खांद्यावर ‘आपला मानूस’च्या दिग्दर्शनाची धुरा आहे. नानासोबत सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत. ही कथा आपल्या वडिलांसोबत राहणाऱ्या एका तरुण जोडप्याची आहे. शहरी जीवन आणि नात्यांची गुंतागुंत यामध्ये अडकलेल्या पित्याची ही कहाणी आहे. त्यांना एका अनपेक्षित घटनेमुळे आयुष्य आणि कुटुंबाविषयीच्या धारणांवर प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते.