त्वचेच्या सौन्दर्याकरिता लोकप्रिय असणाऱ्या लेजर ट्रीटमेंट्स


लेजर ट्रीटमेंट मध्ये जी उपकरणे वापरली जातात, ज्यांच्याद्वारे उष्णता निर्माण करून त्वचेवर असणारे वण, डाग, कस इत्यादी हटविले जातात. या ट्रीटमेंट द्वारे अॅक्ने ( मुरुमे, पुटकुळ्या ), त्वचेवरील ओपन पोअर्स, पिग्मेंटेशन, त्वचेवर आलेले मस, किंवा चामखीळ हटविता येतात. त्वचेच्या निरनिराळ्या समस्यांकरिता निरनिराळी लेजर उपकरणे वापरली जातात. पण या उपचारपद्धतीची किंमत पुष्कळ जास्त असल्याने आजवर ह्याकडे लोकांचा जास्त कल दिसून येत नव्हता. पण लेजर उपचारपद्धतीने त्वचेच्या समस्यांचे निदान कायमस्वरूपी होत असल्याने आता ही उपचारपद्धती लोकप्रिय होऊ लागली आहे.

चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील जुने व्रण, किंवा डाग घालविण्यासाठी या उपचारपद्धतीचा वापर करण्यात येतो. हे व्रण शस्त्रक्रियांमुळे, अपघातांमुळे, किंवा भाजल्यामुळे आलेले असू शकतात. हे व्रण किती जुने आहेत, त्वचेमध्ये किती खोलवर पर्यंत गेलेले आहेत, कशामुळे हे व्रण उपन्न झाले आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून लेजर उपचारपद्धती प्रत्येक क्लायंट साठी ‘ कस्टमाइझ ‘ केली जाते. ह्या ट्रीटमेंट द्वारे त्वचेचे टीश्यू दुरुस्त केले जातात, ज्यामुळे त्वचेवरील व्रण हलके होत जाऊन, दिसेनासे होतात.

वय वाढत जाते तशी चेहऱ्यावरची त्वचा ढिली पडू लागते. ही त्वचा पुनश्च ताणण्याकरिता, म्हणजेच ‘tighten’ करण्याकरिता ‘एनर्जी बेस्ड रेडियो फ्रिक्वेन्सी’ डिव्हाईस चा वापर करण्यात येतो. त्वचेला जितके जास्त tightening आवश्यक असेल, तितक्या जास्त वेळेला ही ट्रीटमेंट पुन्हा पुन्हा घ्यावी लागते. तसेच त्वचेवर अतिप्रमाणात येणाऱ्या मुरुमे पुटकुळ्या , म्हणजेच अॅक्ने कमी करण्यासाठी अनेकदा हार्मोन-बेस्ड ट्रीटमेंट दिली जाते. ह्या ट्रीटमेंट चे काही काळानंतर कमी अधिक प्रमाणात दुष्परिणाम जाणवू लागतात. हे टाळण्यासाठी अॅक्ने करिता लेजर ट्रीटमेंट घेण्याकडे लोकांचा वाढता कल दिसू लागला आहे. ह्या ट्रीटमेंट मुळे अॅक्ने बरे होऊन पुन्हा उद्भवत नाहीत. ह्या ट्रीटमेंट च्या सहाय्याने त्वचेवरील पिगमेंटेशन देखील कमी करता येऊ शकते.

त्वचेवरील, खासकरून चेहऱ्यावरील नकोसे असणारे केस हटविण्यासाठी लेजर ट्रीटमेंट अतिशय उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील केस हटविण्याकरिता महिलांना पुन्हा पुन्हा थ्रेडिंग, किंवा वॅक्सिंग करून घ्यावे लागते. त्यापेक्षा लेजर ट्रीटमेंट करविल्याने चेहऱ्यावरील केस कायमस्वरूपी हटविता येतात. तसेच भुवया, हेअरलाईन, यांना देखील कायमस्वरूपी सुंदर आकार देता येतो.