पेडीक्युअर न करता देखील सुंदर ठेवा आपले पाय


आपण आपल्या चेहऱ्याची आणि हातांची जितकी काळजी घेतो, तितके लक्ष आपण आपल्या पावलांकडे देत नाही. खरेतर आपल्या पावलांना देखील देखभालीची आवश्यकता असते. पण त्याकरिता पार्लरमध्ये जाऊन पेडीक्युअर करविण्याची आवश्यकता नाही. काही गोष्टींची काळजी आपण घेतली, तर पेडीक्युअर न करता देखील आपलो पावले खूप सुंदर, आकर्षक दिसू शकतात.

पावलांच्या नखांवरील नेल पॉलिश उतरविण्यासाठी अॅसीटोन-फ्री नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर करा. अॅसिटोन मुळे नखांमधील आर्द्रता कमी होऊन नखे कोरडी पडतात, व त्यांचे टवके (chip) उडू लागतात. त्याचप्रमाणे पाय स्वच्छ करताना बादलीमध्ये किंवा टब मध्ये गरम पाणी घेऊन, त्यामध्ये थोडासा शँपू घालून त्यामध्ये पाय बुडविणे ही नेहमीची पद्धत आहे. आपण टबमधील पाणी जर खूप गरम असेल, तर त्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होऊन पावले आणखीनच कोरडे पडू शकतील. त्यामुळे पाय स्वच्छ केल्यानंतर टॉवेलने कोरेडे करावेत, आणि त्यावर भरपूर मोईश्चरायझर लावावे. पाय गरम पाण्याच्या टबमध्ये बुडविण्याऐवजी साध्या पाण्याने आणि एखाद्या मृदू ( mild ) साबणाने स्वच्छ करावेत.

दररोज रात्री झोपण्या आधी आपल्या पावलांना एखाद्या चांगल्या फूट क्रीमने मालिश करावी. यामुळे तुमच्या पावलांच्या त्वचेमधील आर्द्रता कायम राहील आणि पावले नरम राहण्यास मदत होईल. तसेच आपल्या आहाराद्वारे आपल्याला पुरेसे कॅल्शियम मिळेल याची काळजी घ्यावी. ताज्या हिरव्या पालेभाज्या, मासे आणि बदाम यांचा समावेश आहारामध्ये असावा. यामुळे शरीराला आणि त्वचेच्या आरोग्याला आवश्यक पोषक द्रव्ये शरीराला मिळतील.