श्रीहरीकोटा – १०० च्या ‘कार्टोसॅट-२ श्रृंखला’ उपग्रहाचे इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केले असून आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटातून हे प्रक्षेपण पार पडले. आज ९ वाजून २८ मिनिटांनी पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकलच्या सहाय्याने ३१ उपग्रहांनी अवकाशात झेप घेतली. गुरुवारी पहाटे ५ वाजून २९ मिनिटांनी “पीएसएलव्ही-सी४०‘ मोहिमेचे काउंटडाऊन सुरू झाले होते.
इस्रोचे शतक पूर्ण; १०० व्या उपग्रहाची यशस्वी झेप
ह्या ३१ उपग्रहांचे एकूण वजन १,३२३ किलोग्रॉम आहे. या ३१ उपग्रहांपैकी ३ भारतीय तर उर्वरीत २८ उपग्रह अन्य देशांचे आहेत. हे अन्य उपग्रह कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, यूके आणि यूएस या देशांचे आहेत. इस्रो मिशन रेडनेस रिव्ह्यू कमिटी आणि लॉन्च ऑथरायझेशन बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या मोहिमेच्या काउंटडाऊनला सुरुवात झाली.
आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोचे हे १०० वे उपग्रह प्रक्षेपण होते. ३१ ऑगस्ट २०१७ ला पीएसएलव्ही मोहिमेला अपयश आले होते. ही मोहीम हिट शील्ड खराब झाल्याने फसली होती. त्यामुळे उपग्रह कक्षात प्रवेश करू शकले नाही. आजची मोहीम ही पीएसएलव्हीच्या अपयशानंतरची पहिली मोहीम होती.