वातानुकुलीत खोलीमध्ये झोपल्याने शरीरावर होतात हे दुष्परिणाम


एकदा उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले, की सर्वप्रथम चालू होतात घरामधील किंवा ऑफिसमधील पंखे. त्यानंतर जसजसा उन्हाचा जोर वाद्धात जातो, तसतसे आपण ही पंख्यांवरून वातानुकूलन यंत्रणेला, म्हणजेच ए सी ला जास्त प्राधान्य देऊ लागतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दिवसा गरमी होत असली, तरी रात्री मात्र उकाड्याचा तडाखा काहीसा कमी जाणवतो. मात्र एकदा का एप्रिल-मे महिन्यांचे दिवस आले, की रात्री देखील उकाडा कमी होत नाही, अश्यावेळी झोपताना देखील ए सी चा वापर करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

रात्री जर तुम्ही वातानुकुलीत खोलीमध्ये झोपत असाल, तर त्याचे शरीरावर होणारे काही दुष्परिणाम तुम्ही लक्षात घेणे अगत्याचे आहे. जेव्हा खोलीमधील वातानुकूलन यंत्रणा, म्हणजेच एसी सुरु असतो, तेव्हा खोलीची सर्व दारे, खिडक्या बन करावे लागतात. त्यामुळे ताजी हवा खोलीमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे खोलीमधील हवा खेळती राहत नाही. अश्या वेळी बंद, कोंदट हवेमुळे क्वचित डोकेदुखी, श्वास गुदमरणे असे त्रास होऊ शकतात. तसेच, एसी चालू असताना जर खोलीतील वातावरण गरजेपेक्षा जास्त थंड झाले, तर वारंवार झोपमोड होते.

वातानुकुलीत यंत्रणेमुळे खोलीमधील हवेतील सर्व आर्द्रता शोषली जाते. परिणामी जास्त काळ वातानुकुलीत खोलीमध्ये राहिल्याने त्वचा कोरडी पडू लागते, तसेच वारंवार तहान लागू शकते. तसेच या खोलीमध्ये ताजी हवा नसल्याने शरीराला सतत थकवा जाणवून शरीर जड वाटू लागते. त्याच बरोबर कधी थंडी वाजून एसी बंद केलाच, तर काही काळाने खोली गरम होऊन परत उकडायला लागते. अश्यावेळी ए सी पुन्हा सुरु करावा लागते. सतत थंड-गरम असे वातावरण राहिल्याने खोलीच्या तापमानामध्ये देखील सतत बदल होत राहतात. ह्या बदलांचा दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतो.

खोलीमध्ये ए सी सतत चालू असल्याने, व खोलीच्या तापमानातील सततच्या चढ-उतारांमुळे रात्री झोपत असताना पाय दुखू लागणे, हलकी डोकेदुखी सुरु होणे, अचानक स्नायू आखडणे, किंवा त्यांमध्ये क्रॅम्पस् येणे अश्या तक्रारी देखील उद्भवू शकतात. ह्या तक्रारी टाळण्याकरिता आपण झोपणार असू त्या खोलीमध्ये झोपण्यापूर्वी काही काळ आधी ए सी चालू करावा, व त्यानंतर खोली पुरेशी गार झाल्यानंतर एसी बंद करून खिडक्या उघडून टाकाव्यात.

Web Title: Due to sleeping in the air conditioned room, the side effects on the body