Skip links

भाजप आणि संघानेच घडवली भीमा-कोरेगावात दंगल – केजरीवाल


सिंदखेडराजा : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सिंदखेडराजा येथे आपच्या ‘महाराष्ट्र संकल्प’ सभेत बोलताना दोन समाजांत भांडणे लावून राजकारण करण्याची भाजपमध्ये पद्धत असून भाजपचा इतिहास दंगलीचा आहे. भाजप आणि आरएसएसने भीमा कोरेगाव येथे देखील दंगल घडवून आणली, असा घणाघाती आरोप केला. त्यांनी यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले.

केजरीवाल भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका करताना म्हणाले, इंग्रजांनी भारतावर फोडा आणि राज्य करा अशी नीती वापरत राज्य केले. पाकिस्तानची निर्मिती त्यातून झाली. पाकिस्तानचे भारतातील शांतता भंग करण्याचे ७० वर्षापासूनचे स्वप्न अवघ्या तीन वर्षात भाजपने पूर्ण केले आहे.

यावेळी ‘आप’कडून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच अशी घोषणा करण्यात आली. दिल्ली सरकारने महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा उचलला आहे. ४० हजार कोटींचे बजेट असताना आप सरकार सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देत आहे. महाराष्ट्रात पण ३ लाख कोटींचे बजेट असताना सरकारी शाळा विक्रीला काढल्या असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा शिवाजी महाराजांचे नाव घेत करण्यात आली. पण याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शेतकऱ्यांची भाजप सरकारला चिंता नसल्याचे सांगत. शेतकऱ्यांना दिल्ली सरकारने दिलेल्या मदतीची माहिती केजरीवालांनी यावेळी दिली. दिल्लीत सत्तेत येऊन तीन महिने झाले होते. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झालेले असताना दिल्ली सरकारने परिस्थितीची पाहणी करून अवघ्या तीन महिन्यांत हेक्टरी ५० हजारांची मदत केली. स्वतंत्र भारतात ही सर्वांत जास्त मदत असल्याचे केजरीवाल म्हणाले. देशभरात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: BJP and the Sangh behind the Bhima-Koregaon riots - Kejriwal