स्मार्ट फोनकेस बनेल ड्रोन- खेचेल मस्त मस्त सेल्फी


स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी कॅमेरे आले आणि जगात सेल्फीची एकच धूम माजली. भलेभले प्रतिष्ठित लोकही सेल्फीपासून दूर राहू शकले नाहीत हा इतिहास आहे. मग सेल्फी अधिक चांगली काढता यावी यासाठी सेल्फी स्टिक आल्या. आता सेल्फीस्टीकचा जमानाही मागे पडला आहे. कारण अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक शो २०१८ मध्ये एक स्मार्टफोन केस सादर केली गेली आहे. ही स्मार्टफोन केसही स्मार्ट आहे कारण तिचे रूपांतर युजर सहजगत्या ड्रोनमध्ये करू शकतो व मनपसंत सेल्फी काढू शकतो.

ही केस म्हणजे आधुनिक व छोटा ट्रान्सफॉर्मरच म्हणता येईल कारण ती पाहतापाहता स्वतःचे मूळ रूप बदलून ड्रोनमध्ये परावर्तित होते. आयएलएलसी नावाच्या कंपनीने ही केस तयार केली आहे व त्याचे प्रात्यक्षिकही दिले आहे. जगातले या प्रकारचे हे पहिलेच प्रॉडक्ट असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या केसमध्ये बसविण्यात आलेल्या १३ एमपीच्या वाईड अँगल कॅमेर्‍यामुळे उंचावरून सेल्फी काढता येतात तसेच व्हीडीओही काढता येतात. हे फोटो अतिशय स्पष्ट येतात. केसची जाडी १० मिमी इतकीच आहे व ती ४ किंवा ६ इंची स्क्रीनच्या स्मार्टफोनसाठी वापरता येणार आहे. ही केस फोल्ड होते तसेच बॅटरी फुलचार्ज असेल तर ५ मिनिटे ड्रोन बनून हवेत उडू शकते. यामुळे फिल्मीस्टाईल फोटो काढणे युजरला शक्य होणार आहे. मार्च,एप्रिलपासून ही केस अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तिची किंमत आहे १३० डॉलर्स म्हणजे ८२८२ रूपये.

Leave a Comment