पतंजली आयुर्वेदला ग्लोबल ब्रँड बनण्याची संधी


भारतात अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांची सुट्टी केलेल्या स्वदेशी पतंजली आयुर्वेदला आता ग्लोबल ब्रँड बनण्याची संधी आली असून फ्रान्सच्या लग्झरी ग्रुप एलव्हीएमएच ने पतंजलीत मोठा हिस्सा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपनीच्या सहयोगी कॅटटर्न प्रा. इक्विटी फंडने त्यांच्या आशिया फंडातून राहिलेले ५० कोटी डॉलर्स पतंजलीत हिस्सेदारीसाठी मोजण्याची तयारी दाखविली आहे. कंपनीचे अधिकारी म्हणाले पतंजलीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांसाठी कोणतीही योजना नाही याची आम्हाला कल्पना आहे मात्र तरीही त्यांनी त्यानुसार नियम केला तर आम्ही तयार आहोत.

पतंजलीचे अध्यक्ष बाळकृष्ण यांनी पतंजली त्यांचे शेअर्स कदापी परदेशी कंपन्यांना विकणार नाही असे स्पष्ट करतानाच परदेशी कंपन्यांची तयारी असेल तर आम्ही त्यांच्याकडून पाच हजार कोटींचे कर्ज घेण्यास तयार आहोत असे सांगितले आहे. बँकेपेक्षा कमी दराने हे कर्ज मिळाले तर आम्हाला त्यात रूची आहे असे सांगताना ते म्हणाले देशात प्रगतीसाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे मग प्रगतीसाठी विदेशी कर्जाऊ पैसे घेण्यास हरकत नसावी. अर्थात हे कर्ज आम्ही आमच्या अटींवर व नियमांनुसारच घेऊ असेही ते म्हणाले. पतंजलीची सध्याची व्हॅल्यू ५ अब्ज डॉलर्सवर गेल्याचे उद्योगसंबंधी तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment