सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी उडवली मोदी सरकारची झोप


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकार देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर हादरले आहे. या पत्रकार परिषदेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांना या प्रकरणी चर्चा करण्यासाठी तातडीने पाचारण केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर यात टीका केली. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाच्या कामकाजात अनियमतता होती. यासंदर्भात आम्ही सरन्यायाधीशांनाही पत्र लिहीले होते. पण त्याचा काही फायदा झाला नाही असा आरोप या न्यायमूर्तींनी केला होता. पंतप्रधान मोदी यांनी या पार्श्वभूमीवर आपत्कालीन बैठक बोलवली असून रविशंकर प्रसाद यांना पाचारण केले आहे. चार न्यायाधीशांनी मांडलेल्या समस्यांवरही चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.